नगर जिल्ह्यात गाळेधारकांना अवाजवी भाडे आकारणी, शिवसेनेने घेतली बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नगर

नगर महानगरपालिका हद्दीमध्ये असणाऱ्या गाळेधारकांना अवाजवी भाडे आकारणी करण्यात आलेली आहे. या प्रश्नासंदर्भात शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड तसेच महापौर सुरेखा कदम यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी येथील महानगरपालिका सभागृहामध्ये गाळेधारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृह नेते गणेश कवडे, स्थायी समितीचे सभापती शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, संजय शेंडगे, संभाजी कदम, योगीराज गाडे, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, काका शेळके, मुदस्सर शेख, महानगरपालिकेच्या प्रभारी उपायुक्त ज्योती कावरे, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदींसह पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

शहरात ८८४ गाळेधारक असून सोमवारी गाळे चालकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. नळ नसताना गाळेधारकांना पाणीपट्टी लावली कशी? याची चौकशी करावी, स्थायी समितीने यात लक्ष घालावे, जिल्हाधिकारी पूर्णवेळ आयुक्त व्हावेत अशी मागणी अनिल राठोड यांनी केली आहे.

शिवसेना गाळेधारकांबरोबरच आहे. विशेष सभा काढून तुमचे प्रश्न सोडविणार असं आश्वासनही राठोड यांनी दिलं आहे. हा प्रश्न गंभीर आहे. सभागृहात मार्ग काढून गाळेधारकांना न्याय द्यावा. महासभेत निर्णय होईपर्यंत गाळ्यांना सील लावायचे नाही, असा इशाराही राठोड यांनी दिला आहे. शिवसेनेच्या पुढाकारातून महानगरपालिकेत बैठक घेण्यात येणार असून या प्रश्नावर २० जुलै रोजी महासभा घेणार असल्याचं आश्वासन महापौर सुरेखा कदम यांनी दिलं आहे.