इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, नाशिकमध्ये संततधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिह्यातील इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर व नाशिक शहरात रविवारी संततधार पाऊस झाला. जिह्यात २४ तासांत एकूण ४६९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या संततधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर येथील अहिल्यादेवी धरण दुथडी भरून वाहत आहे.

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यामध्ये दिवसभर मध्यम ते जोरदार सरी बरसत होत्या. नाशिक शहरात रात्रभर संततधार पाऊस सुरू होता, सकाळी त्याने उघडीप दिली. सुरगाणा, सिन्नर, निफाड, येवला, चांदवड, दिंडोरी या तालुक्यांत तुरळक पाऊस पडला. मालेगाव, सटाणा, नांदगाव, कळवण व देवळा या तालुक्यांमध्ये पाऊस झाला नाही.

मुसळधार पावसाचा इशारा
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिह्यात १६ व १७ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गोदावरीची पाणीपातळी वाढली
नाशिकमध्ये रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली आहे. रात्री संततधार बरसलेल्या पावसाने दिवसा उघडीप दिली होती.

४६९.९ मिलिमीटर नोंद
नाशिक जिह्यात चोवीस तासात ४६९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १५२ मिलिमीटर पाऊस इगतपुरीत झाला. त्यापाठोपाठ त्र्यंबकेश्वरमध्ये ९९ मिलिमीटर पाऊस पडला. तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : इगतपुरी- १५२,त्र्यंबकेश्वर- ९९, पेठ- ८७.५, नाशिक- ५२.१, सुरगाणा- ३६.५, दिंडोरी- २०, निफाड- ८.४, सिन्नर- ५.२, कळवण- ५, चांदवड- २.२, येवला- २, देवळा- ०, नांदगाव- ०, मालेगाव- ०, सटाणा- ०.

गंगापूर धरण ६५ टक्के भरले
त्र्यंबकेश्वर परिसर आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे एकाच दिवसात गंगापूर धरणातील पाणीसाठा नऊ टक्क्यांनी वाढला. या धरणाची साठवण क्षमता ५६३० दशलक्ष घनफूट आहे. शनिवारी येथे ३१७६ दशलक्ष घनफूट (५६ टक्के) साठा होता. आज हा साठा ३६६७ दशलक्ष घनफूट (६५ टक्के) इतका झाला आहे.