
सामना प्रतिनिधी, अमळनेर
तालुक्यातील मारकड येथील ग्रामपंचायतमध्ये १४ व्या वित्त आयोगात सुमारे २० लाख रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. मुदतीत खुलासा न सादर केल्याने गटविकास अधिकाऱयांनी तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱयांवर प्रत्येकी ५० टक्के जबाबदारी टाकून अंतिम कारणे दाखवा अशी नोटीस शुक्रवारी बजावण्यात आली आहे.
मारकड ग्रामपंचायतीत तत्कालीन सरपंच कसंत चुडामन पाटील व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी सुखदेव रामसिंग पारधी यांनी २०१५ ते २०१८ या कालाकधीत १४ व्या वित्त आयोगाचा कुठलाही कृती आराखडा तयार केला नाही. तसेच अंदाजपत्रक, कामांची प्रशासकीय मान्यता नाही. तांत्रिक मान्यता नाही, असे असतानाही बेकायदेशीररीत्या कामे करून ई-टेंडरिंग असताना टेंडर न काढता लाखोंची बिले काढली. मूल्यांकन केले नाही, पाणीपुरवठा साहित्य खरेदी, आरओ सिस्टीम, पाईपलाईन, अंगणवाडी दुरुस्ती, कामाबाबत मासिक सभा व ग्रामसभा यांची कोणतीही मान्यता न घेता मनमानी पद्धतीने कामे करून भ्रष्टाचार केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य पंकज पाटील यांनी केली होती. त्यानुसार विस्तार अधिकारी एल. डी. चिंचोरे यांनी चौकशी केली असता अनियमितता व अपहार आढळून आला.
गटविकास अधिकारी संदीप कायाळ यांनी त्यावरून सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर १९ लाख ४९ हजार ३० रुपयांच्या अपहारात प्रत्येकी ५० टक्के रकमेचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस ३० जून रोजी दिली होती. मात्र, दोघांनीही खुलासा सादर केला नाही. दरम्यान, तत्कालीन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी ग्रामपंचायत दप्तर तपासले असता गंभीर अनियमितता व अपूर्णता आढळून आल्याचा ठपका ठेवून ग्रामविकास अधिकाऱयांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकरी अधिकाऱयांना दिले होते. त्यांनतर पंकज पाटील यांच्या तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिकारी संदीप कायाळ यांनी अंतिम कारणे दाखवा नोटीस देऊन ग्रामविकास अधिकाऱयांचे वर्तन जि.प. सेवा ( वर्तणूक) अधिनियम १९६७ चा भंग करणारे व सरपंचाच्या वर्तन ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) प्रमाणे कार्यवाहीस पात्र असल्याचा ठपका ठेवून ७ दिवसांच्या आत खुलासा मागवला आहे.
































































