
सामना प्रतिनिधी । कुडाळ
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली व सातारा या भागात झालेल्या दरोड्याची पद्धत आणि पावशी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेवरील दरोडा यात साम्य आहे. यामागे परप्रांतातील सराईत गुन्हेगारांचा हात असण्याची शक्यता आहे. लवकरच गुन्हेगारांना जेरबंद करू असा विश्वास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश काकडे यांनी व्यक्त केला.
मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी – भटवाडी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅँकेवर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती. यात बॅकेतील स्ट्राँग रूम फोडून दरोडेखोरांनी बॅंकेतील रोख पाच लाख रुपये व लोकांनी तारण (गहाण) ठेवलेले सुमारे दहा लाखाचे सोन्याचे दागिने असा जवळपास पंधरा लाख रुपयांहून अधिक मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून बॅँकेची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
याबाबत सिंधुदुर्ग पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जलदगतीने तपास सुरु केला आहे. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश काकडे यांच्याशी चर्चा केली असता यापूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात घडलेल्या दरोड्याच्या घटनांमधीलच पद्धत गुन्हेगारांनी पावशी येथील दरोड्यात वापरली आहे. तसेच या गुन्ह्यातील गुन्हेगार सराईत असून परजिल्ह्यातील टोळी असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करणार आहेत. या दरोड्यात गुन्हेगारांनी गॅसकटरचा वापर करून तिथेच टाकून गेलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात ऑक्सिजन सिलेंडरचा तपास केला असता तो दोन दिवसांपूर्वी ओरोस येथील एका गॅरेजमधून चोरीस गेल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच एक ठसा मिळाला असून तो तपासकामात महत्वाचा ठरणार आहे असे काकडे यांनी यावेळी सांगितले. रविवारी सायंकाळी रत्नागिरी येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी श्वान महामार्गापर्यंतच घुटमळल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.



























































