
सामना प्रतिनिधी, मुंबई
पश्चिम रेल्वेच्या मागे लागलेले बिघाडाचे शुक्लकाष्ट संपण्याचे नावच घेत नसल्याचे सोमवारी पुन्हा उघड झाले. दादर रेल्वे स्थानकाच्यामध्ये एसी लोकलचे दरवाजेच न उघडल्याने प्रवाशांना मनस्ताप भोगावा लागल्याची घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. एका प्रवाशाने ट्वीट करून रेल्वे प्रशासनाविरोधतला आपला राग व्यक्त करीत प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे रेल्वे परत करणार काय?असा सवाल केला आहे.
पश्चिम रेल्वेच्या मार्गावर चर्चगेट ते विरार धावणाऱया एसी लोकलच्या सध्या १२ फेऱया चालविण्यात येत आहेत. या लोकलच्या दोनच फेऱया पिकअवरमध्ये चालतात. चर्चगेट ते विरार जाणाऱया फेरीचा थांबा दादर स्थानकात सकाळी ९.१० वा. होता. मात्र, गाडीचे दरवाजे उघडलेच नसल्याने चढणाऱया आणि उतरणाऱया प्रवाशांचे वांदे झाल्याची तक्रार मालकम कपाडिया या प्रवाशाने ट्वीटरवर केली.



























































