भाजप आमदार भातखळकरांकडून शिवाजी महाराजांचा घोर अपमान, शिवसेनेसह विरोधक आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकाची उंची कमी करण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या पुतळ्याच्या विषयावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विरोधक ‘भलता सलता’ विषय काढून राजकारण करत असल्याचे गंभीर विधान केले. या विधानामुळे छत्रपतींचा अपमान झाला असून भातखळकरांनी तात्काळ माफी मागावी असल्याची आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली. तर विरोधकांनी देखील हा मुद्दा उचलून धरत भातखळकरांचं निलंबन करा अशी मागणी केली.

पाहा अतुल भातखळकर काय म्हणाले: 

छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात भाजपच्या आमदारांनी वापरेली भाषा अयोग्य असून त्यांनी माफी मागावी अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतल्यानंतर विरोधकांनी देखील ही मागणी उचलून धरली. सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर अतुल भातखळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्याने सभागृहातील आमदारांचे समाधान झाले नाही. त्यांनी आमदार भातखळकर यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यामुळे पुन्हा गोंधळाला सुरुवात झाली. अखेर सभागृहाचे कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आले.

महाराजांच्या अपमानामुळे शिवसेना भडकली

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या संदर्भात सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. माहितीच्या अधिकारानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची कमी केली आहे’, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तेव्हा आमदार भातखळकर हे चिडले आणि त्यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. ‘मी या सदनात पाहतो आहे की गेल्या दोन वर्षांपासून की जो सभागृहाचा अजेंडा आहे तो बाजूला सारून ‘भलत्या’ काही विषयांवर पॉईंट रेज केले जातात.’, असे विधान केले. त्यानंतर सभागृहातील आमदार आक्रमक झाले. भातखळकरांनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर सभागृह दोनदा तहकूब झाले. अखेर अतुल भातखळकर यांनी माझ्या शब्दाने गैरसमज झाला असेल तर मी माझे शब्द मागे घेतो, असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली. मात्र यावरून विरोधकांचे समाधान झाले नाही. आणि पुन्हा गोंधळ सुरू झाला.

atul-bhatkhalkar-bjp