वाऱ्यावर आरुढ – अभिनेत्री मनीषा केळकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रतिनिधी

अभिनेत्री मनीषा केळकर. ‘फॉर्म्युला-४’ या खूप मानाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार रेसिंग स्पर्धेत ती भाग घेतेय.

वाऱ्याच्या वेगाने धावणारी कार… सुसाट वेग… थरारकता आणि जिद्द असा ‘फॉर्म्युला-४’ कार रेसिंगचा भन्नाट अनुभव सध्या अभिनेत्री मनीषा केळकर अनुभवतेय. कुठल्याही रेसचा अनुभव नसताना केवळ जिद्द, चिकाटीच्या बळावर ती ‘फॉर्म्युला-४’ स्पर्धेत उतरली आहे. या यशाबाबत तिचं कौतुक होतंय.

मनीषाला लहानपणापासूनच थरारक खेळांची आवड… स्काय डायव्हिंग, स्कुबा डायव्हिंग आवडायचं. शिक्षण झाल्यावर तिला एअरफोर्समध्ये वैमानिक व्हायचं होतं, पण त्यावेळी मुलींना फायटर जेटसाठी परवानगी नव्हती. फक्त कार्गो होते. ती म्हणते, साहसी खेळांची मला पहिल्यापासूनच आवड आहे. भन्नाट वेगाने कार चालवायची हे तिचं स्वप्न होतं. अखेर तिचं ते स्वप्न ‘आहुरा’च्या माध्यमातून पूर्ण झाले. हिंदुस्थानातील पहिली मुलींची टीम म्हणजे ‘आहुरा’. त्यांनी कार रेसिंग टीम बनवण्याचा निर्णय घेतला. ते हिंदुस्तानातून कार रेसिंगसाठी मुलींच्या शोधात होते. साधारण १९० प्रवेशिकांमधून ६० जणींना निवडले. त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यातल्या सर्वोत्तम सहा निवडल्या. त्यात महाराष्ट्रातून माझी निवड झाली. आता मी राष्ट्रीय पातळीवर खेळतेय. हे एक असे व्यासपीठ आहे जिथे मुलगा-मुलगी फरक मानला जात नाही. दोघांचीही यात कसोटी असणार आहे, दोघंही एकत्र स्पर्धा खेळणार असल्याचेही तिने स्पष्ट केलं.

आपला अनुभव सांगताना ती म्हणते, आमचं प्रशिक्षण सुरू होतं तेव्हा मी कुणालाच याबाबत सांगितलं नव्हतं. कारण मला माझ्यातली क्षमता ओळखायची होती. तिथे बऱ्याचजणी बरीच वर्षे रेसिंग करतायत, बायकर्स आहेत. पण मला तर काहीच अनुभव नव्हता. मुंबईतल्या वाहतूक कोंडीत गाडी चालवते तेवढीच, बाहेरही मी गाडी जास्त चालवत नाही. पण आवडणाऱ्या गोष्टीत मी स्वतःला पूर्णपणे झोकून देते. ते पाहूनच कदाचित माझी निवड झाली असावी.

रेसिंगमध्ये क्षमतेची प्रचंड गरज असल्याने मनीषा सध्या त्याकडे जास्त लक्ष देतेय. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि तिचे काम यामध्ये व्यस्त आहे. ही रेसिंग स्पर्धा चार महिने असणार आहे. पहिली रेस जुलैच्या सुरुवातीला झाली. त्यात १० वर्षे अनुभव असलेले काही पुरुष करत आहेत. त्यांच्याबरोबर मनीषाही आहे. त्यात वयाची मर्यादा नाही. त्यांच्याबरोबर येण्यासाठी तिने पुन्हा आता स्ट्रेन्थ ट्रेनिंग सुरु केलंय. त्यात २०० स्पीडला गाडी पळवायची असते. यात तुमचा बॅलेन्स, स्नायूंमध्ये ताकद असणे गरजेचे असते. नेक बॅलेन्सही तितकाच आवश्यक असतो. गाडीबाहेर येतो तेव्हा खूप थरथरायला होते, असं ती सांगते. हा एक भन्नाट अनुभव असतो. त्यासाठी तेवढीच क्षमता लागते.

रेसिंग झाल्यावर मुंबईत आल्यावर मनीषाने डबिंग, शूटिंग सुरू ठेवले आहे. त्यातून वेळ मिळाला तर कोईम्बतूरला जाऊन प्रशिक्षण घेते. जुलैची रेसिंग झाली आता ऑगस्टच्या अखेरीस होणार आहे. नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात होईल, असं ती स्पष्ट करते. तिथल्या प्रशिक्षणाचा अनुभव सांगताना ती म्हणते, सरोश हतारिया माझे प्रशिक्षक आहेत. त्यांनी आहुरा टीम बनवली आहे. त्यांनी खरोखर विचार केला की या क्षेत्रात जास्त मुली नाहीत. त्यांची टीम तयार केली. हा विचार येणंही फार महत्त्वाचे असल्याचे ती सांगते. महागडा खेळ म्हणून याकडे पाहिलं जातं. पण याचं प्रशिक्षण मोफत देण्यात आलं. हे सगळं सरोश यांच्यामुळे शक्य झाल्याचंही ती सांगते.

या खेळात मुलींना आणणार

ज्या मुलींना रेसिंगची आवड आहे, पण परवडत नाही, त्यांच्यासाठी मी स्पॉन्सरशिप मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. रेसिंग म्हणजे फक्त गाडी चालवणे नव्हे खूप कॅल्क्युलेशन असतात. खूप स्किल लागते. एका सेंकदात गडबड होऊन गाडय़ा उडतात. हे शिकण्यासाठी वेळ जातो. पण ज्यांना आवड आहे, अशा मुलींना या खेळात आणायचे आहे, असे मनीषा ठामपणे सांगते.

वेब सीरिज करायचीय…

जे करेन त्याचा आनंद घेऊन आणि मनापासून… हेच लहानपणापासून मनीषा केळकर हिचं ध्येय आहे. अभिनयात ती रमतेच, पण रेसिंग तिचं पॅशन आहे. त्यात तिला आपली एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. सध्या तिचे मराठी, हिंदी, इंग्लिश अशा तिन्ही भाषेत शूटिंग, डबिंगचे काम सुरू आहे. आता पुढे तिला वेब सीरिज करायच्या आहेत. त्यासाठी ती प्रयत्न करणार आहे.