रस्ता ‘खड्डय़ा’त घालणाऱ्या कंत्राटदाराला दररोज एक लाखाचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील खड्डय़ांमुळे पालिकेवर जोरदार टीका होत असल्यामुळे प्रशासनाने रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याआधी एका कंत्राटदाराला काळय़ा यादीत टाकण्यात आले असून आता एका कंत्राटदाराला रस्त्याचे काम चांगले होईपर्यंत दररोज एक लाख रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे.

रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे पालिका प्रशासनाला शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी महासभेत चांगलेच फैलावर घेतले. यावेळी प्रशासनाने ४८ तासांत मुंबईतील सर्व खड्डे भरण्याचे आश्वासन दिले, मात्र ही डेडलाइन संपून दोन दिवस उलटले तरी रस्त्यावर अजूनही शेकडो खड्डे आहेत. खड्डे बुजवण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना शास्त्रोक्त पद्धतीनेच करावे लागणार आहे. बुजवलेला खड्डा जर पुन्हा उखडला तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने याआधीच जाहीर केले होते. यानुसार याआधी झोन-३ मध्ये रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने करणारा कंत्राटदार मनदीप सिंग कस्ट्रक्शनला काळय़ा यादीत टाकण्यात आले आहे. तर आता बी.पी.एस.पी.एल. विशाल ऍण्ड कन्स्ट्रक्शनला जोपर्यंत रस्त्याचे काम चांगले होत नाही तोपर्यंत दररोज एक लाख रुपये दंड भरण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या एका अधिकाऱयाने दिली.

म्हणून ठोठावला दंड
बी.पी.एस.पी.एल. विशाल ऍण्ड कन्स्ट्रक्शनकडे घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील नवीन रस्त्याच्या देखभालीचे काम सोपवण्यात आले आहे, मात्र संबंधित कंत्राटदाराने १०० मीटर रस्त्याची योग्य देखभाल केली नाही. या रस्त्याच्या पाहणीनंतर हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे जोपर्यंत हा रस्ता संबंधित कंत्राटदार नीट करीत नाही तोपर्यंत हा दंड भरावा लागेल. या कारवाईमुळे कंत्राटदार रस्त्यांची निगा राखतील आणि मुंबईकरांना चांगले रस्ते मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.