काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारी समितीवर आमदार बाळासाहेब थोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमनेर

काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीवर कायमस्वरुपी निमंत्रीत सदस्य म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहीती काँग्रेसचे जनरल सेक्रटरी अशोक गहलोट यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत मोठे बदल केले असून यामध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या कार्यकारी समितीवर थोरात यांची निवड केली आहे. या समितीमध्ये माजी मुख्यमंत्री शिला दिक्षीत, माजी केंद्रीय मंत्री पी. चिंदम्बरम, ज्योतीरादित्य शिंदे, तारीक अहमंद, राजीव सातव यांसह ११ जणांचा समावेश आहे.

स्वच्छ व कार्यक्षम प्रतिमा असलेल्या आमदार बाळासाहेब थोरातांवर मागील निवडणूकांमध्ये पक्षाने प्रचाराची मोठी जबाबदारी दिली होती. ती यशस्वीपणे पार पाडतांना आ.बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळवून दिले. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठता, सेवाभावीवृत्ती, कामाची तत्परता व सामान्य नागरिकांशी थेट संवाद यामुळे मागील गुजरात विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील गुजरातच्या विधानसभा निवडणूकीची महत्वाची जबाबदारी आ.थोरात यांच्याकडे देण्यात आली होती. तसेच हिमाचल प्रदेशचे निरीक्षक व महाराष्ट्र विधान मंडळाच्या अभ्यास दौर्‍याचे अध्यक्षपद ही त्यांनी सक्षमपणे सांभाळले आहे.