
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
शहरात निर्माण झालेली कचराकोंडी कधी फुटणार? या कोंडीतून तातडीने मार्ग काढा आणि शहर कचरामुक्त करा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी पत्रकारांना सांगितले.
शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य, सभागृह नेता विकास जैन यांनी आज मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर शहरातील विकासकामांचा आढावा घेतला.
शहरातील ८० टक्के कचरा उचलला
शहरातील रस्त्यावर साचलेले कचऱयाचे ढीग हटविण्याचे काम दोन दिवसांत करण्यात आले असून सुमारे एक हजार टन कचरा उचलण्यात आला आहे. आता केवळ ३०० टन कचरा शिल्लक असून तोही उचलण्यात येणार आहे. महिनाभरात कचऱयाचा प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.
समांतर प्रश्नी २४रोजीच्या सभेत निर्णय घेणार
समांतर पाणापुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी २४ जुलै रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. या निर्णयाची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार असल्याचे महापौर घोडेले म्हणाले.
तो निर्णय भाजपचा
मनपामध्ये भाजप फरफटत जाणार नाही असे भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी म्हटले आहे. याकडे लक्ष वेधले असता कचरा प्रश्नावरून कोंडी होत असेल तर सत्तेत राहायचे की नाही याचा विचार त्यांनी करावा. निर्णय त्यांचा आहे असे महापौर म्हणाले.
कचरा प्रश्न मार्गी लावा, नाहीतर मनपा बरखास्त करू; मुख्यमंत्र्यांची धमकी
कचरा प्रश्न धुमसत ठेवण्यासाठी भाजपच जबाबदार असल्याचा आरोप होताच बिथरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरला या प्रश्नावर बैठक घेतली. कचराप्रश्न मार्गी लावा नसता मनपाच बरखास्त करू अशी धमकीच यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी दोन दिवसांत रोडमॅप तयार करण्याचे फर्मानही त्यांनी प्रशासनाला सोडले.



























































