
सामना प्रतिनिधी, मुंबई
यूपी, बिहारला जाणाऱ्या प्रवाशांना कल्याण स्थानकात हेरून कुर्ला टर्मिनसमध्ये गाडीत बसण्यास जागा मिळवून देतो, अशी बतावणी करून भामटे त्यांना कुर्ला यार्डात घेऊन जायचे. मग तेथे चाकूने वार करून प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना रेल्वे पोलिसांच्या कल्याण युनिटने अटक केली आहे.
शाम पटेल (२७) हा बिगारी काम करणारा तरुण १५ जुलैला गावी जाण्यासाठी कल्याण स्थानकात आला होता. तो तिकीट काढण्यासाठी तिकीट हॉलमध्ये थांबलेला असताना दोन अज्ञात तरुण त्याच्याजवळ गेले आणि ओळख काढून त्यांनी शामचा विश्वास संपादन केला. तुला कुर्ला टर्मिनसमध्ये गाडीत बसण्याची जागा मिळवून देऊ, असे सांगत त्याला लोकलने कुर्ल्याला घेऊन आले. कुर्ल्यात उतरल्यानंतर रेल्वे पटरीतून कुर्ला यार्डात घेऊन गेले. तेथे त्यांनी आणखी एका साथीदारास बोलावून घेतले आणि तिघांनी चाकूने शामवर वार केले आणि जबरीने शामकडील चार मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतली होती. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राइम ब्रँचच्या कल्याण युनिटने समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय किरण मतकर, शिवाजी पाटील, शंकर परदेशी आदींच्या पथकाने कल्याण स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले.
नागपाड्यात सापडले
प्रवाशांना कुर्ला यार्डात नेऊन लुटणारे आरोपी नागपाडा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नागपाडा येथील फुटपाथवर राहणाऱ्या मोहम्मद चाँदलुले खान (२२), फरमान रज्जब खान (२१) आणि दिन मोहम्मद अयूब खान (३५) या तिघांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून आठ मोबाईल फोन, तीन चाकू असा मुद्देमाल हस्तगत केला.























































