
>> अरुण मालेगावकर
हसून जगा आणि आरोग्य उत्तम राहते की नाही बघा!
एकतर राजकारणात बरेच दगड आणि मौनी बाबा भरपूर आहेत. राजशिष्टाचार नियमांनी आवळलेले असल्याने मोकळेपणाने हसणेसुद्धा उद्धटपणाचे ठरते. नेते आणि अभिनेते हे पूर्णतः सार्वजनिक असल्याने ते ‘चुकून’ वावगा शब्द बोलले तरी घातक ठरते. मात्र अनेकदा अनेक गोष्टी हसून वेळ मारून ‘नेता’ येतात!
‘शिष्टाईचे इंद्रधनु’ हे अशाच रोचक माहितीने भरलेले पुस्तक अनेक खुमासदार घटनांनी गंभीर व गमतीदार झाले आहे. लेखक विजय नाईक हे प्रदीर्घ काळ (दिल्लीत) पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. युद्ध वार्ताहर म्हणून प्रत्यक्ष आघाडीवर काम करून आले आहेत. जागतिक पातळीवरील पत्र संघटनांचे पदाधिकारी म्हणून थोरामोठय़ांमध्ये वावरताना त्यांना आलेले अनुभव जितके वेगळे आहेत, तितकेच त्यांचे वाचनही अफाट आहे याचा प्रत्यय या पुस्तकाचे वाचन करताना येतो.
परराष्ट्र वकिलातीत केवळ मुख्याधिकारीच नव्हे, तर कलावंत, प्रतिभावंत, तत्त्वज्ञ, संगीतकारादी सरस्वतीपुत्रांचाही तिथे राबता असतो. हीच मंडळी देशादेशांच्या सीमा पार करतात. किंबहुना विश्वबंधुत्वाच्या भावनेने माणसांना जोडतात. मुळातच या विषयावर मराठीत फारसे कुणी लिहीत नाही. त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच राजकारण्यांचे प्रेम आणि प्रणय प्रकरणांबाबत हिंदुस्थानात मौनच बाळगतात. त्यांच्या पत्नीचा तर कुठे आवाजही नसतो (अर्थात तेही बायकोला शक्यतो पडद्याआडच ठेवतात!). अस़ो (किंवा नसो).
स्वामी विवेकानंद हे हिंदुस्थानचे आध्यात्मिक राजदूत होते, तर गुरुदेव टागोर हे सांस्कृतिक राजदूत होते. टागोर हे १९२६ मध्ये इटलीच्या दौऱयावर होते. इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याला ते भेटले. त्यांच्यात झालेला संवाद अविस्मरणीय आहे. ‘इंडो-इटली’ मित्रमंडळ स्थापन करण्याची कल्पना टागोरांना आवडली. पुढे काय झाले, ते वाचायला हवे.
माओ (चीन) यांना उपराष्ट्रपती राधाकृष्णन भेटले, तेव्हा त्यांच्या शाही भोजनात शिजवलेले मांजर आणि सापाचे तळलेले तुकडे पाहून राधाकृष्णन त्या तेवीस पदार्थांकडे पाहून थंडावले. त्यांनी एकच शाकाहारी पदार्थ चव पाहण्यासाठी खाऊन पाहिला. बाकी तो दिवस उपवासाचाच गेला. तसेच राजदूत कसे चोरटा व्यापार करतात, बोरिस येल्त्सिन यांचे मद्यपान (की आजार?), लेनिन, पुतिन, गडाफी (लिबिया), शिष्टाईचा मार्गही पोटातून जातो, इंदिरा आणि भुत्तो यांच्यातील समझोता, पापड गेला युरोपात, संयुक्त राष्ट्रसंघातील संघर्ष, माओ अन् नेहरूंची दोस्ती, ‘कन्यारत्ना’ला इंग्रजीत/जपानीत काय म्हणतात, ढोंगी सामाजिक जीवन, हॉटलाइन, शिष्टाईतील गुन्हेगारी या अशा काही शीषर्कांवरून एकूण पुस्तकाचा अफाट आवाका लक्षात येऊ शकतो.
हिंदुस्थानच्या राजकारणातच इतक्या असंख्य घडामोडी रोज होत असतात की, परदेशांतील प्रसंगांकडे आपण क्वचितच वळतो. हे पुस्तक वाचल्यावर वाटते की, अशा पुस्तकांचे अनुवाद किंवा किस्से मराठीत येणे फार आवश्यक आहे (प्रकाशकांनो लक्ष द्या!),
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रधान सचिव (केंद्र सरकार, दिल्ली) व लेखक ज्ञानेश्वर मुळे यांची प्रस्तावना वाचनीय आहे. राजू देशपांडे आणि शेखर गोडबोले यांचे मुखपृष्ठ विषयाला साजेसे, समर्पक आहे.
शिष्टाईचे इंद्रधनू
लेखक – विजय नाईक
प्रकाशक – रोहन प्रकाशन, पुणे
पृष्ठ – १८८, मूल्य – २२५ रुपये




























































