
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसैनिक जनहिताच्या प्रत्येक प्रश्नावर आंदोलन करतात म्हणूनच शिवसेना मुंबईत मजबुतीने पाय रोवून उभी आहे असे प्रशंसोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज काढले. आदेश न मागता शिवसैनिकांसारखे प्रत्यक्ष काम करून दाखवा, अशा कानपिचक्याही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गदर्शन शिबिरात भुजबळ यांनी शिवसेनेवर स्तुतीसुमने उधळली. शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलन करतात आणि आपले कार्यकर्ते आदेशाची वाट बघत बसतात असे सांगतानाच ‘एकतर नमस्कार नाहीतर चमत्कार’ असे काम करा, असे भुजबळ यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
मुंबईचे गुजरात करण्याचा डाव
बुलेट ट्रेन आणून मुंबईचा गुजरात करण्याचा डाव सुरू झाल्याचा आरोप करतानाच भुजबळ यांनी ही महाराष्ट्राच्या छाताडावर झाडलेली बुलेट ट्रेन आहे अशी टीका केली. पंतप्रधान देशाचे आहेत की गुजरातचे, असा सवाल करत त्यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला.
राहुल गांधी यांनी दिलेल्या जादूच्या झप्पीवरूनही भुजबळ यांनी पंतप्रधान मोदींनाच लक्ष्य केले. मोदी हेसुध्दा वेगवेगळ्या देशांच्या पंतप्रधानांना जादूची झप्पीच देत सुटतात असे ते म्हणाले. सतत परदेश दौरे करणारे मोदी यांनी क्रोएशिया देश सुटला असेल तर तिथेही जाऊन या अशी खिल्लीही उडवली.
मोदी हे परदेशात पंतप्रधान म्हणून जातात तेव्हा देशाचे प्रतिनिधी असतात, पण तिथे गेल्यानंतर ते घरातले राजकारण काढतात, इंदिरा गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करतात हे चुकीचे असल्याचे पवार म्हणाले. परदेश दौऱयावर आपल्या राजकीय हितशत्रूंना लक्ष्य करू नका असा सल्लाही पवार यांनी मोदींना दिला.
काँग्रेस नेतृत्वाशी भूतकाळात माझेही मतभेद झाले होते पण स्वातंत्र्यलढय़ात महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू आणि इतर काँग्रेस नेत्यांनी बजावलेल्या भूमिकेचा मी आदर करतो असे पवार म्हणाले. मोदींना पर्याय काय असे आपण विचारतो पण पर्याय हा रातोरात उपलब्ध होत नसतो असे सांगून समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे असे पवार म्हणाले.
मोदींनी देशातील जनतेचा भ्रमनिरास केला!
लोकशाहीच्या माध्यमातून जनतेने भाजपाच्या हाती सत्ता सोपवली; परंतु गेल्या चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेचा भ्रमनिरास केला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या शिबिरात केली. मोदी सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले असल्याचे पवार म्हणाले. राज्याराज्यांमध्ये, माणसांमध्ये, समाजांमध्ये एकवाक्यता राहील याची काळजी सरकारने घ्यायला हवी होती; परंतु तसे झाले नाही. समाजांमध्ये, माणसांमध्ये तेढ वाढली, ही चिंतेची बाब असल्याचा आरोप पवार यांनी केला.
































































