
सामना ऑनलाईन, परभणी
येथील ग्रामपंचायतची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. आमदार व जि.प. सदस्यही राष्ट्रवादी काँग्रेसचे असताना देखील या परिसरातील नागरिकांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील काही दिवस साचलेल्या पाण्यामुळे परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली आहे. नागरिक या दुर्गंधीने बेजार झाले आहेत. या बाबींकडे वरिष्ठ अधिकार्यांनी वेळीच लक्ष देऊन समस्यांचे निवारण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील पेठ विभाग मधील वार्ड क्रमांक ४ मध्ये परभणी जि.प. सदस्याचे निवास स्थान आहे व सत्ताधारी पक्षाचे तीन ग्राम पंचायत सदस्य राहतात. तसेच परीसरातील माळी गल्लीतील मुख्य रोडवर ठिक-ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत. नाली असूनही पाणी रस्त्यावर वाहत असून साफ-सफाई केलेली नाही. रस्त्यावरील साचलेल्या पाण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे नालीतील सर्व घाण पाणी रस्त्यावर साचत आहे. या सर्व प्रकारामुळे परिसरात डासांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामविकास आधीकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना कळवूनही याबाबीकडे कानाडोळा केला जात आहे. या समस्येचा सर्वात मोठा फटका शालेय विद्यार्थ्याना बसला असून शाळेत ये-जा करण्यासाठी त्यांना चिखलमय रस्त्यातुनच वाट काढावी लागते. परीसरातील नागरिकांना रहदारीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या समस्यांकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देऊन तो लवकरात लवकर सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वयोवृद्ध व महिलांना त्रास
सदरील पेठ भागात नाल्यांची साफसफाई नसल्याने ते दुर्गंधीयुक्त पाणी सरळ रस्त्यावरुन वाहत आहे. त्यामुळे महिला व वयोवृद्ध नागरिकांना या साचलेल्या पाण्यातील चिखलातून मार्ग काढताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.






























































