मराठा आरक्षणासाठी तरुणाची ‘गोदावरी’त जलसमाधी, आंदोलनाला हिंसक वळण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, गंगापूर

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनाला गंगापुरात हिंसक वळण लागले. या मागणीसाठी काकासाहेब शिंदे याने पुलावरून थेट गोदावरी पात्रात उडी घेतली. पात्रात जीवरक्षक नसल्यामुळे अवघ्या काही मिनिटांत त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेचे संतप्त पडसाद उमटले असून अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड, दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी नगर रोडवर ‘रास्ता रोको’ सुरू केल्याने दोन्ही बाजूला कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप करत आंदोलकांनी मृतदेह गंगापूरच्या पोलीस ठाण्यात आणला असून मुख्यमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणाव वाढला आहे. शिवसैनिक असलेला काकासाहेब शिंदे हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सुरुवातीपासून आघाडीवर होता.

मराठा आरक्षण आंदोलनात काकासाहेब शिंदे याचा बळी गेल्याचे वृत्त वाऱ्यासारखे सर्वत्र पसरले. गंगापूर शहरात शिवाजी चौक परिसरात आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. काही वाहनांची तोडफोडही करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही या आंदोलकांनी केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सानप हे कायगाव येथे आले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलकांनी त्यांना पिटाळून लावले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेत आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने नगर रोडवर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. या आंदोलनात सकल मराठा समितीबरोबर शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मण सांगळे, जिल्हा युवा अधिकारी संतोष माने, मच्छिंद्र देवकर, गणेश राऊत, दिलीप निर्फळ, कारभारी दुबिले, विनोद काळे, शिवाजी बोडखे, सूर्यकांत थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर नीळ, वाल्मीक शिरसाट, काँग्रेसचे संतोष जाधव, अण्णासाहेब जाधव, मच्छिंद्र पठाडे, मच्छिंद्र देवकर, विनोद काळे, दिलीप निर्फळ, गणेश राऊत यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. पोलीस ठाण्यासमोर हजारो संतप्त कार्यकर्त्यांचा जमाव गोळा झाला असून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.

पोलिसांची बेपर्वाई, प्रशासन बेफिकीर
मराठा आंदोलकांनी जलसमाधी घेणार असल्याचे निवेदन दिल्यानंतर कायगाव टोका पुलावर वाढीव पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दलाचे पथक तसेच गोदापात्रात जीवरक्षक तैनात ठेवणे गरजेचे होते, मात्र प्रत्यक्षात पुलावर बंदोबस्तासाठी बोटावर मोजण्याएवढे पोलीस होते. सकाळी १० वाजता मराठा कार्यकर्त्यांनी कायगावच्या पुलावर आंदोलन सुरू केले. दुपारी तीन वाजता अचानक कार्यकर्त्यांचा एक जथा कठडय़ाकडे निघाला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करताच काकासाहेब दत्तात्रय शिंदे (२५) याने पुलावरून उडी मारली.

भाजप सरकार जबाबदार -राणे
कणकवली- राज्यात मराठा आंदोलन चिघळल्यास त्यास भाजप सरकार जबाबदार राहील असे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारकडून मराठा समाजाला गृहीत धरले जात आहे. मराठा क्रांती मोर्चानंतर सरकारने वेळीच पावले उचलत आरक्षणासंदर्भात आपली भूमिका न्यायालयासमोर मांडली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती असे ते म्हणाले. दरम्यान, आंदोलनाची दिशा, स्वरूप बदलत असून मराठा समाजाचा संयम सुटू लागला आहे. त्यामुळे सरकारने वेळीच निर्णय घ्यायला हवा, असेही ते म्हणाले.

सरकार आल्याशिवाय परळीतून माघार नाही!
परळी येथे सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन आज सातव्या दिवशीही सुरू होते. ‘सरकार’ आल्याशिवाय आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय परळीतून माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली. आमदार अमरसिंह पंडित यांनी आज आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. दरम्यान, भाजपचे आमदार भीमराव धोंडे यांनी पाठिंबा दिल्यानंतर पाटोदा येथील आंदोलन स्थगित करण्यात आले. गंगापूर घटनेच्या निषेधार्थ येथे बसेसवर दगडफेक करण्यात आली.