
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनावेळी गंगापुरात काकासाहेब शिंदे याने पुलावरून थेट गोदावरी पात्रात उडी घेतली आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांनी आंदोलकांची ना भेट घेतली ना शिंदे कुटुंबीयांची विचारपूस केली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक बंब यांच्यावर संतापले आहेत. या संदर्भातील एक कथित क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मराठा समाजातील घोणसे-पाटील नावाच्या एका व्यक्तीने आमदार प्रशांत बंब यांच्याशी फोनवर साधलेला संवाद ऐकायला मिळतो. या व्यक्तीने बंब यांना घटनेनंतर पोलीस ठाण्यात माहिती घेण्यासाठी का नाही पोहोचलात, तसेच जलसमाधी घेतलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांची विचारपूस का केली नाही, असा सवाल केला. त्यावर बंब यांनी पोलीस तपास सुरू असून आपण तेथे आलो असतो तर वाद आणखी चिघळला असता आणि राज्यात त्याचे पडसाद उमटले असते, असं म्हंटल्याचं ऐकायला मिळतं. तसेच मराठा आंदोलकांमुळेच त्याचा जीव गेल्याची भाषा देखील त्यांनी वापरल्याची ऐकायला मिळते.
दरम्यान, सोशल मीडियावर फिरणाऱ्या या क्लिपची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र प्रशांत बंब यांनी साधी विचारणा देखील केली नसल्याने मराठा आंदोलकांमध्ये त्यांच्या विषयी रोष असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आहे.




























































