
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशात जमावाकडून होणाऱ्या हत्या थांबवायच्या असतील तर लोकांनी गोमांस खाणं सोडलं पाहिजे, अशी मुक्ताफळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेत इंद्रेश कुमार यांनी उधळली आहेत. राजस्थान येथील अलवरमध्ये गोतस्करीच्या आरोपामुळे रकबर खान याची जमावाने हत्या केली होती. या घटनेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना कुमार यांनी हे वक्तव्यं केलं आहे.
इंद्रेश कुमार हे संघ परिवारातील एक संघटना असलेल्या राष्ट्रीय मुस्लीम मंचचे संरक्षक आहेत. २० जुलै रोजी अलवर येथे झालेल्या सामूहिक हिंसाचारात रकबर खान याचा मृत्यू झाला होता. या घटनेवर प्रतिक्रिया देताना कुमार म्हणाले की, जर गोहत्येवरून कोणाची हत्या होत असेल, तर ते समर्थनीय असूच शकत नाही. पण, तुम्हाला सामूहिक हिंसा थांबवायची असेल तर गोमांस खाणं सोडा, असं अजब तर्कट कुमार यांनी मांडलं आहे.
‘जगातला कोणताही धर्म गोहत्येला परवानगी देत नाही. अगदी इस्लामपासून ते ख्रिश्चन धर्मापर्यंत कोणत्याही धर्मात गोहत्येला जागा नाही, असा दावाही कुमार यांनी केला आहे. इंद्रेश कुमार यांच्या खेरीज भाजप नेते विनय कटियार यांनीही मुस्लिमांनी गायीला हात लावण्यापूर्वी विचार करावा, कारण या देशातली कोट्यवधी लोकांच्या भावनांचा प्रश्न आहे, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.




























































