जळगाव जिल्ह्यात मराठा मोर्चाचा कडकडीत बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर गोदावरी नदीपात्रात उडी घेवून काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्त्या केल्यानंतर आरक्षण आंदोलन अधिकच चिघळले आहे. सकल मराठा मोर्चातर्फे मंगळवारी राज्यभर बंदचे आवाहन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला.

जळगाव मराठा मोर्चाचे भिमराव मराठे, अ‍ॅड.कुणाल पवार, प्रतिभा शिंदे, देवेंद्र पाटील, अ‍ॅड.सचिन पाटील, डॉ.राजेश पाटील, वंदना पाटील यांच्यासह अनेक सदस्य मंगळवारी दुपारी बंदचे आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरले. शहरातील गोलाणी मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, टॉवर चौक, दाणाबाजार परिसरातील दुकाने व्यापाऱ्यांना आवाहन करून बंद करण्यात आली. मराठा समाजातर्फे आज दुपारी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, मनपा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने शांततेत आंदोलन करण्याच्या सुचना उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्या.

चाळीसगावात देखील बंद
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगावच्या गोदावरी पुलावरून काकासाहेब शिंदे या तरुणाने उडी घेतल्यानंतर शासन या घटनेला जवाबदार असल्याचे धरत मंगळवारी चाळीसगाव बंदची हाक देण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शहरातील वर्दळीच्या सिग्नल चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले असून वाहतूक ठप्प झाली आहे. पोलीस प्रशासनाने सतर्कता म्हणून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, बंदमध्ये शहरातील शाळा, महाविद्यालये, भाजीपाला व्यावसायीक तसेच दवाखाने आदी अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

चोपडा शहर शंभर टक्के बंद
सकाळी १० वाजता  चोपडा शहरातील महात्मा गांधी शिक्षण मंडळात जाऊन तेथील संचालक मंडळाला मराठा समाज क्रांती मोर्चाच्या समाज बांधवांनी महाविद्यालय बंद करण्याची विनंती केली. तेथुन छत्रपती शिवाजी चौकात मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून चौकातील दुकाने बंद केली. मेनरोड वरील व्यापारी बांधवांनी स्वतःहुन आपली  दुकाने बंद केली.