पिंपरी-चिंचवड : महापौर, उपमहापौरपदासाठी तीव्र स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनोद पवार । पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी पदाचे राजीनामे दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राजीनामे देण्यात आले आहेत. त्यानंतर आत्ता इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महापौरपदासाठी आमदार महेश लांडगे समर्थक राहुल जाधव, संतोष लोंढे आणि आमदार लक्ष्मण जगताप समर्थक नगरसेवक शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम व नामदेव ढाके यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. स्थायी समिती सभापती पद चिंचवड मतदार संघात असल्यामुळे महापौर पद भोसरी मतदार संघाकडे कायम राहण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभाऱ्यांनी सर्व नगरसेवकांना पंचवार्षिकमध्ये एक तरी पद देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार स्थायी समितीतील सदस्यांना एक वर्षांचाच कार्यकाळ देण्यात आला. त्यानंतर विषय समितींचे सभापती, प्रभाग समिती अध्यक्ष बदलण्यात आले. त्याचबरोबर प्रभाग  समित्यांवर दोन्ही आमदारांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावली आहे. ममता गायकवाड यांच्या रुपाने सर्वांत महत्वाचे स्थायी समिती अध्यक्षपद चिंचवड मतदार संघाकडे आहे. तसेच विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौघुले आणि जैव विविधता व व्यवस्थापन समितीच्या सभापती उषा मुंढे या चिंचवड मतदार संघातील आहेत. तर, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती संजय नेवाळे भोसरी मतदार संघातील आहेत. तर, शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे या भोसरी मतदार संघातीलच आहेत. असे पदांचे वाटप झाले असून समिती सभापती बदलण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली होती. त्यामुळे महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेता बदलण्याच्या मागणीने उचल खाल्ली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी शहरात आले होते. त्यावेळी पदाधिकारी बदलाबाबत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पदाधिकारी बदलास हिरवा कंदील दिला. त्यानंतर मंगळवारी  महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्याकडे राजीनामे दिले आहेत.नवीन महापौर, उपमहापौर निवडीनंतर सभागृह नेते एकनाथ पवार यांना देखील बदलण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापौरपदासाठी स्थायी समिती सभापतीपदासाठी डावलण्यात आलेले आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक राहुल जाधव, संतोष लोंढे, आमदार लक्ष्मण  जगताप यांचे समर्थक शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम आणि नामदेव ढाके यांची नावे चर्चेत आहेत. तसेच विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले वसंत बोराटे हे देखील दावेदार आहेत. लोंढे यांनी तर पत्रकार परिषद घेऊन आपण महापौरपदाचा दावेदार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, शत्रुघ्न काटे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला असून जात प्रमाणपत्राची फेर पडताळणी करण्याचे आदेश न्यायालयाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली असून त्यांचे नाव महापौरपदाच्या शर्यतीतून मागे पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी शशिकांत कदम, राहुल जाधव आणि संतोष लोंढे यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. महापौरपद भोसरीकडे कायम राहिल्यास सभागृह नेतेपद चिंचवमधील निष्ठावान नगरसेवक नामदेव ढाके किंवा भोसरी मतदार संघात जाण्याची चिन्हे आहेत. तर, उपमहापौर पद पिंपरी मतदार संघातील नगरसेवक शितल शिंदे यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा आहे.