
सामना ऑनलाईन । मुंबई
‘मेट्रो’साठी आतापर्यंत मुंबईतील तब्बल ६३०३ झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यामध्ये तोडण्याची मंजुरी घेतलेल्या २८०१ झाडांव्यतिरिक्त आणखी ३५०३ झाडे तोडण्यात आली आहेत. पालिका प्रशासनाच्या या धोरणाविरोधात वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आतापर्यंत किती झाडे पुनर्रोपित केली आणि त्यापैकी किती जगली याचा हिशेब द्यावा अशी मागणी करण्यात आली.
‘एमएमआरसी’कडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशा ३२.५ कि.मी. ‘मेट्रो-३’ मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे, मात्र या मार्गात येणाऱया झाडांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल सुरू आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला पालिकेकडून फक्त २८०१ झाडे तोडण्याची मंजुरी घेण्यात आली. मात्र त्यानंतर ‘मेट्रो’कडून वेळोवेळी कामासाठी झाडे तोडण्याची निकड व्यक्त करून मंजुरी मिळवण्यात येते. त्यामुळे अशी अतिरिक्त झाडे तोडल्याचा आकडा तब्बल ३५०३ वर गेला आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आज वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत ही बाब उघड केली. यावेळी पुन्हा १५ झाडे तोडण्यासाठी आलेला प्रस्तावही बहुमताने फेटाळून लावण्यात आला.
अशी झाली झाडांची कत्तल
मे २०१७ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘मेट्रो’ने पालिकेकडून २८०१ झाडे तोडण्यासाठी मंजुरी मिळवली. त्यानंतर ‘मेट्रो’च्या १५ स्थानकांसाठी २१४ झाडे तोडण्यात आली. आरे इलेक्ट्रिक टॉवर शिफिंगसाठी १३७, आरे कारशेडसाठी ३०७, यार्डसाठी ५४ अशी झाडे तोडण्यात आली. यानुसार मंजुरी घेतलेली – २८०१, अतिरिक्त – ३४२६ तर मुंबई सेंट्रल येथील आणखी ७६ अशी मिळून ६३०३ झाडे आतापर्यंत तोडण्यात आली.
आधी पुनर्रोपित झाडांचा हिशेब द्या
मेट्रोसाठी आतापर्यंत जेवढय़ा झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले ती झाडे कुठे लावली, त्यापैकी किती झाडे जिवंत आहेत याचा आधी हिशेब द्या मगच झाडे कापण्याचे प्रस्ताव आणा, अशी ठाम भूमिका आज शिवसेनेने वृक्ष प्राधिकरणच्या बैठकीत मांडली. पुनर्रोपित झाडांचा हिशेब देण्यास टाळाटाळ करणाऱया प्रशासनाला पुढील बैठकीपर्यंतची मुदत शिवसेनेने दिली. मेट्रोसाठी मालाडमधील पाच झाडे काढण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीने राखून ठेवला. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो लाइन-७ च्या कामासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मोतीलाल नेहरू रोड जंक्शन ते राणी सती मार्ग जंक्शन यादरम्यानची पाच झाडे कापण्याचा प्रस्ताव आज वृक्ष प्राधिकरण समितीकडे प्रशासनाने पाठवला होता. या प्रस्तावावरील चर्चेवेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि बाजार उद्यान समिती अध्यक्ष हाजी हालीम खान यांनी कडाडून विरोध केला.
– सरकारच्या वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत मुंबईत प्रतिवर्षी सहा हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र यामध्ये लावलेली किती झाडे जगतात, असा सवाल यशवंत जाधव यांनी केला. ‘वन’ धोरणानुसार लोकवस्तीच्या ३५ टक्के भाग हा झाडांनी व्यापलेला असावा. मात्र मुंबईतील हे प्रमाण केवळ २० टक्के असल्याचे जाधव म्हणाले.
– मुंबईच्या दीड कोटी लोकसंख्येचा विचार करता मुंबईत असलेल्या २९७५२२८ झाडांनुसार पाच माणसांमागे फक्त एक झाड आहे. कॅनडामध्ये हेच प्रमाण प्रतिमाणसामागे – ८९५३ झाडे, ब्राझील – १२९३, चीन – ११०२ असे प्रमाण आहे.

























































