
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत आधीच घरांच्या किंमती गगनाला भिडल्या असताना आता या महागाईच्या आगीत राज्य सरकारने स्टॅम्प ड्युटीचे तेल ओतले आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी अधिक निधी उभारण्यासाठी स्टॅम्प ड्युटीत १ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे घरांच्या किंमती आणखी कडाडणार आहेत.
मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन (एमएमसी) कायद्यात बदल करण्यासाठी एका नवीन कायद्याचा मसुदा विधानसभेत नुकताच उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार मालमत्तेवर १ टक्का स्टॅम्प ड्युटी जादा आकारण्यात यावी आणि पालिकेला ज्यादा आकारलेल्या निधीच्या तुलनेत समान निधी देण्यात यावा असे नमदू करण्यात आले होते.
रिअल इस्टेटचा उद्योग संकटात
रिअल इस्टेटचा उद्योग सध्या संकटात आहे. त्यात १ टक्का स्टॅम्प ड्युटीमध्ये वाढ म्हणजे रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यासारखेच आहे.- राजन बांदेलकर, अध्यक्ष- नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल
महत्त्वाकांक्षी उद्योजक मागे हटणार
मुंबईत अनेक महत्त्वाकांक्षी बांधकाम व्यावसायिक मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभारत आहेत. परंतु, सरकारच्या या निर्णयामुळे हे उद्योजक एक पाऊल मागे घेण्याची शक्यता आहे. – राजीव जैन, संचालक, निर्मल लाईफस्टाईल
घरांची विक्री कमी होणार
राज्य सरकारने मालमत्तेवर स्टॅम्प ड्युटीत वाढ करण्याच्या निर्णयाचा गृहनिर्माण क्षेत्रात विरोध होत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गृहनिर्माण संकटात येणार असून परवडणाऱ्या घरांची विक्रीही कमी होणार आहे. – अशोक मोहनानी, अध्यक्ष, एकता वर्ल्ड
रिअल इस्टेट क्षेत्रात निराशा
रिअल इस्टेट क्षेत्र निराशेच्या गर्तेत जाण्याची शक्यता आहे. जे परवडणाऱ्या बाजारात मालमत्ता घेण्याचा विचार करत आहेत, ते दरवाढीमुळे पुढे येणार नाहीत. – धवल अजमेरा, संचालक,
अजमेरा ग्रूप































































