
विजय जोशी । नांदेड
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांना जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बुधवारी दुपारी दादरा येथे रास्तारोको करण्यात आला. रास्तारोकोला संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना आमदार हेमंत पाटील, शिवसेना आमदार सुभाष साबणे, शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर व जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांची या रास्तारोकोला प्रमुख उपस्थिती होती.
मंगळवारी दुपारी राज कॉर्नर येथे मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या रास्तारोको व निदर्शने कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्हाप्रमुख भुजंग पाटील निघाले असताना भाग्यनगर कॉर्नरवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. राज कॉर्नर येथे ते जमिनीवर बसले असताना मीणा व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर जखमी अवस्थेत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेवून मीणा व त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले. यानंतर भुजंग पाटील यांची तब्येत बिघडल्याने त्यांना आधार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. या घटनेचे बुधवारी तीव्र पडसाद उमटले.
सुरुवातीला नांदेड विश्रामगृहात आमदार हेमंत पाटील, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख बाबूराव कदम, सहसंपर्क प्रमुख प्रकाश कौडगे, उमेश मुंढे, डॉ.मनोजराज भंडारी, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, शहरप्रमुख दत्ता कोकाटे, शहरप्रमुख पप्पू जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करुन हा हल्ला प्रत्येक शिवसैनिकांवर असल्याचे सांगून जोपर्यंत चंद्रकिशोर मीणा यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. यानंतर शिवसेना आमदार हेमंत पाटील, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी तात्काळ सर्व शिवसैनिकांना शिवाजीनगर दादऱ्यावर पोहंचण्यास सांगितले आणि तेथे आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून रास्तारोको करण्याचे निर्देश दिले. दुपारी दिड वाजल्यापासून हे रास्तारोको आंदोलन सुरु झाले असून, शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक यामुळे पूर्णतः खोळंबली आहे. अशाही परिस्थितीत चार रुग्णवाहिकांना शिवसैनिकांनी वाट करुन दिली. या रास्तारोकोच्यावेळी शिवसैनिकांनी आपल्या भावना घोषणाव्दारे व्यक्त केल्या. जय भवानी जय शिवाजी, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई करा, पोलीस अधीक्षकांचा निषेध असो, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आदी घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता.























































