
सामना प्रतिनिधी । शिर्डी
साईबाबा संस्थानमधील आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांनी इनसोर्सिंगमध्ये समावेश होण्यासाठी ऐन गुरूपौर्णिमा उत्सवाच्या तोंडावर काम बंद आंदोलन छेडले असून या आंदोलनाला शिर्डीतील स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान गुरूपौर्णिमा उत्सव असल्याने भाविकांचे हाल होवू नये यासाठी कर्मचाऱ्यांचा विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांबरोबर चर्चा घडवून आणू. तसेच संवादातून मार्ग निघण्यास मदत होणार असल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित करावे असे आवाहन शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी केले. मात्र आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम असल्याने साई संस्थान प्रशासनाने पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे.
साईसंस्थानने साईआश्रम, भक्तनिवास, भोजनालय, रूग्णालयात आऊटसोर्सिंगद्वारे स्वच्छतेचे व इतर कामांसाठी ठेकेदाराला कर्मचारी पुरवण्याचे टेंडर दिलेले आहे. मात्र संबंधित ठेकेदार हा कर्मच्याऱ्यांना वेळेवर पगार देत नाही, विमा संरक्षण देत नाही. त्यामुळे आम्हाला साईसंस्थानने इनसोर्समध्ये घ्यावे या व इतर मागण्यांसाठी संस्थानमधील आऊटसोर्सिंग कर्मच्याऱ्यांनी छत्रपती कॉम्प्लेक्स समोरील प्रांगणात आंदोलन सुरू केले आहे.





























































