घरफोडीतील चार सराईत गुन्हेगार गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी शहरासह जिल्ह्यातील पाथरी मानवत या ठिकाणी घरफोड्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी विशेष कामगिरी बजावत घरफोडी प्रकरणातील चार अट्टल सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील ६ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपाधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.

१७ जुलै रोजी परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाणेंतर्गत खानापूर फाटा येथे दुकानाचे शटर वाकवून चोरीच्या घटना घडल्या. त्यापाठोपाठ पाथरी, मानवत या ठिकाणी देखील मेडिकल, किराणा, कापड, शेती उपायोगी साहित्य दुकानात चोरीचे प्रमाण वाढले होते. या चोरी संदर्भात गांभिर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी एक पथक तयार करुन नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे रवाना केले. विश्वासात घेऊन चौकशी आणि पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक (रा. जालना), राजूसिंग मायासिंग बावरी, अर्जुनसिंग पंडितसिंग जुन्नी, शंकर मरीबा नामेवार (तिघे रा. नांदेड जिल्ह्यातील उमरी) यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीस गेलेल्या मालापैकी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल, किराणा सामान आणि एक बोलेरो जीप असा एकूण ६ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणातील दीपकसिंग टाक हा चोऱ्या करणाऱ्यासाठी तरबेज असून वाहनचालक व इतर अट्टल गुन्हेगारांची निवड करुन एक टोळी तयार केली होती. एक मास्टर चावी तयार करुन तिचा उपयोग करुन चोऱ्या करत असे. या आरोपींनी आंध्रप्रदेशात तसेच धर्माबाद, जालना, पुणे या ठिकाणीही गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. परभणी स्थागुशाच्या पोलिसांनी  नुकतेच दोन आरोपींचे घरफोडीचे प्रकार उघडकीस आणल्यानंतर त्यापाठोपाठ आता चार जणांना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुग्रीव  केंद्रे, शिवदास धुळगुंडे, निलेश भूजबळ, सय्यद मोईन, किशोर चव्हाण, शंकर गायकवाड, श्याम काळे, सय्यद मोबीन, शेख अहजर, अरुण कांबळे, गणेश कौटकर आदीनंी कामगिरी बजावली.