
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थान आणि इंग्लंड क्रिकेट संघामध्ये १ ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी दोन्ही संघाचा सराव सामना सध्या अॅलेक्स काऊंटी मैदानावर सुरू आहे. या दरम्यान हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंग्लंडच्या संघाला डिवचले आहे. सध्याचा हिंदुस्थानचा संघ तक्रार करण्यात विश्वास ठेवत नाही आणि इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांमधील आपल्या प्रदर्शनासाठी खराब परिस्थितीची कारणं देणार नाहीत, असे शास्त्री म्हणाले आहेत. यापूर्वी हिंदुस्थान दौऱ्यावर असताना इंग्लंडने पराभवासाठी मैदानाला कारणीभूत ठरवले होते.
पत्रकारांशी संवाद साधताना शास्त्री म्हणाले की, माझा सिद्धांत पक्का आहे. तुमच्या देशामध्ये मी प्रश्न उपस्थित करत नाही आणि माझ्या देशात तुम्ही प्रश्न उपस्थित करू नका. मी मैदानावरील कर्मचाऱ्यांना सांगितले की खेळपट्टीवरील गवत काढू नका तसेच राहूद्या. खेळपट्टी तयार करण्याचा यजमान देशाचा अधिकार आहे. तुम्ही खेळपट्टी तयार करा आण्ही खेळण्यासाठी तयार आहोत. या दौऱ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत हिंदुस्थानी संघ खेळपट्टीबाबत तक्रार करताना दिसणार नाहीत. आम्ही जेथे जातो तेथे आपल्या प्रदर्शनावर गर्व करतो आणि विदेश दौऱ्यामध्ये सर्वात चांगले वर्तन करणारा संघ म्हणून आमचा संघ ओळखला जावा अशी इच्छा आहे. तक्रार करणारा हा शेवटचा संघ असेल.’
तसेच सराव सामना ४ दिवसांऐवजी ३ दिवसांचा खेळवण्यावर बोलताना शास्त्री म्हणाले की, ‘प्रचंड गरमास आणि खराब वातावरणामुळे सामना ४ ऐवजी ३ दिवसांचा करण्यात आला. परंतु पहिल्या कसोटीपूर्वी बर्मिंघममध्ये आम्हाला सराव करण्यासाठी तीन दिवसांचा वेळ मिळणाह आहे. जर आम्ही ४ दिवसांचा सराव सामना खेळलो तर एक दिवस प्रवासामध्ये जाईल. यजमान संघाचा हा अधिकार आहे की तुम्ही दोन, तीन किंवा चार दिवसीय सराव सामना खेळता.’




























































