
सामना ऑनलाईन, हिंगोली
जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता दिलीप कांबळे यांना लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभगाने पकडले आहे. कांबळे यांच्याकडून कार्यालयातील लिपिक विशाल मस्के यांच्यामार्फत पाच हजार रुपयांची लाच एका व्यक्तीकडून स्वीकारल्याप्रकरणी हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली.
औंढा तालुक्यातील एका व्यक्तीच्या आई आणि चुलतीच्या नावावर अहिल्यादेवी होळकर सिंचन विहीर योजनेचे काम रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात आले होते. या कामासंबंधी कुशल कामाची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन उप अभियंता मार्फत मंजुरी मिळवून देण्यासाठी कनिष्ठ अभियंता दिलीप कांबळे यांनी लाच मागितली होती. आज औंढा नागनाथ येथील ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयात दिलीप कांबळे यांच्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना विशाल मस्के याला पकडण्यात आले. याप्रकरणी मस्के व कांबळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील तक्रारदार व्यक्तीचे नाव व गाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्त ठेवले असून नेमकी कार्यवाही आज किती वाजता झाली याची माहिती देण्यात आली नाही. आज रात्री आठ वाजता प्रसिद्धी पत्रकातून काढून हिंगोली एसीबीकडून ही माहिती देण्यात आली आहे.























































