
सामना ऑनलाईन, बंगळुरू
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बी.एस.येडीयुरप्पा यांनी एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं आहे. कर्नाटकातील राजकीय परिस्थिती अस्थिर असून आपल्याला अजूनही सत्ता मिळू शकते असा दुर्दम्य आत्मविश्वास असलेल्या येडीयुरप्पा यांच्या या यज्ञाची तिथे जोरात चर्चा सुरू आहे. येडीयुरप्पांनी आपल्या दोन्ही मुलांसह या यज्ञात भाग घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
येडीयुरप्पा यांनी आयोजित केलेल्या या यज्ञाबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात येत आहे. उडुपी जिल्ह्यातील कुठयार गावात या यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा यज्ञ २७ जुलै रोजी म्हणजेच गुरुपोर्णिमेच्या दिवशी केला जाणार असल्याचं कळतंय. या दिवशी पूर्ण चंद्रग्रहण असल्याने यज्ञासाठी हाच दिवस निवडण्यात आला असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
जानेवारी महिन्यात एचडी देवेगौडा यांनी अतिरुद्र यज्ञाचं आयोजन केलं होतं. या यज्ञामुळेच त्यांच्या मुलाला म्हणजेच कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पद मिळालं असं सांगण्यात येतंय. पूर्ण चंद्रग्रहण हे सत्ताधारी मंडळींसाठी अत्यंत धोकादायक असतं असं काही अंधविश्वासू राजकारण्याचं मत आहे. यामुळेच या दिवशी यज्ञ आयोजित करत कुमारस्वामींची सत्ता उलथवून टाकत पुन्हा मुख्यमंत्री बनण्यासाठी येडीयुरप्पांनी या यज्ञाचं आयोजन केल्याचं बोललं जातंय. ो




























































