
सामना ऑनलाईन । कोलकाता
“एका राज्याची मुख्यमंत्री म्हणून मी राज्यातील लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे, लोकायुक्तांना नाही” असे वक्तव्य करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नवी खळबळ उडवून दिली आहे. लोकायुक्तांच्या अधिकार कक्षेतून मुख्यमंत्र्यांना वगळण्याच्या ठरावावरील चर्चेत ममता बोलत होत्या.
लोकपाल कायद्याच्या कक्षेतून पंतप्रधानांप्रमाणे मुख्यमंत्र्यांनाही वगळण्यात यावे असा प्रस्ताव पश्चिम बंगाल विधानसभेत चर्चेला आला आहे. या ठरावात लोकप्रतिनिधींची चौकशी करताना सरकारची मंजुरी आवश्यकच असावी असाही आग्रह धरण्यात आला आहे. ममता पुढे म्हणाल्या की, “लोकशाहीत चर्चा व्हायलाच हवी. पण चुकीचे पायंडे अथवा प्रथा मात्र पडू नयेत. बंगालच्या लोकांनी मला मुख्यमंत्रीपदी बसवले आहे. त्यामुळे मला सवाल करायचा अधिकार राज्यातील नागरिकांनाच आहे ,अन्य कुणालाही नाही ,असे माझे स्पष्ट मत आहे. आम्ही बहुमताने सत्तेत आलो आहे. त्यामुळे एखादी घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार आम्हाला घटनेनेच दिलाय. उद्या अन्य कोणताही पक्ष बहुमतात आला तर त्यांनाही तो असेल” असेही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
केंद्रात लोकपाल कायद्याची अंमलबजावणी अद्याप का झाली नाहीय ?
राज्यांना लोकपाल नियुक्तीसाठी आग्रह धरला जातोय, मग केंद्रातील मोदी सरकारने अद्याप लोकपाल कायद्याची अंमलबजावणी का केली नाही, असा प्रश्नही ममता यांनी उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या, “येत्या १० दिवसांत लोकपाल नियुक्तीचे वाचन मी देते. मात्र खोट्या बातम्या आणि वृत्ते देऊन गोंधळ निर्माण करणाऱ्या प्रसिद्धीमाध्यमांना लोकपाल कक्षेपासून दूर का ठेवले हा माझा प्रश्न आहे.” सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने वादळी चर्चेनंतर पश्चिम बंगाल विधानसभेत लोकायुक्त दुरुस्ती विधेयक २०१८ अखेर मंजूर करून घेतले.























































