आयुर्वेदिक शक्तिवर्धक गोळ्यांमध्ये सापडलं ‘व्हायग्रा’, एफडीएची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

शक्तिवर्धक आयुर्वेदिक गोळ्यांमध्ये व्हायग्रा आणि एका मलमात अॅनेस्थेटिक ड्रग सापडल्याने खळबळ उडाली आहे. संभाजीनगर येथील अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या कारवाईत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. एफडीएकडून आयुर्वेदिक गोळ्या आणि मलमांची चाचणी करण्यात आली. या चाचणीत पॉवर अप नामक कॅप्सुल्स आणि टायगर किंग क्रीम ही दोन उत्पादनं दोषी आढळली आहेत. त्यामुळे एफडीएने या दोन्ही उत्पादनांचा माल जप्त केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या दोन औषधांपैकी शक्तिवर्धक गोळ्यांमध्ये अॅलोपॅथीमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हायग्राचा समावेश आहे. तसंच मलमात एका भूल आणणाऱ्या रसायनाचा समावेश आहे. मात्र, या दोन्ही उत्पादनांच्या वेष्टणांवर अॅलोपॅथिक रसायने वापरल्याचा कोणताही उल्लेख केलेला नाही. संभाजीनगर येथील सृष्टी युनानी मेडिसिन एजन्सीमधून ही औषधे जप्त करण्यात आली आहे. या एजन्सीत एफडीएला तब्बल १६ हजार रुपये किमतीची औषधे मिळाली असून त्यावर उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथील नमन इंडिया कंपनीचे उत्पादन असल्याचं नमूद आहे. त्यामुळे नमन इंडिया या कंपनीविरोधात एफडीएने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अशा प्रकारे आयुर्वेदिक औषधांमध्ये अॅलोपॅथिक रसायनांची भेसळ करणं हा गुन्हा आहे. अशा प्रकारच्या भेसळीमुळे आयुर्वेद या वैद्यकीय शाखेची बदनामी होत असल्याची खंत अनेक आयुर्वेदिक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसंच व्हायग्रा समाविष्ट असलेली औषधं किमान ३० ते ४० रुपयांना उपलब्ध होतात. पण, तीच व्हायग्रा आयुर्वेदिक उत्पादनात भेसळ करून जवळपास हजार रुपये प्रतिगोळी इतक्या महागात विकली जाते. त्यामुळे ग्राहकाची फसवणूक होते. तसंच अनेकजण आयुर्वेदिक औषधांचा कोणताही साइड इफेक्ट नसतो, अशा कल्पनेत असतात. पण, लैंगिक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधं देखील वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, कारण जर त्यावेळी अन्य कोणतीही प्रतिजैविकं किंवा अॅलोपॅथिक औषधं सुरू असतील, तर त्याची सरमिसळ होते. या सरमिसळीतून जिवाचा धोकाही उद्भवू शकतो, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Viagra found in ayurvedic medicine at sambhajinagar. FDA seized the samples and lodge complaint against the company.