भटकेगिरी : चीनची काळी आई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

इंग्लंडहून एखाददोन लेखांसाठी मी तुम्हाला हिंदुस्थानात घेऊन येतो.

मध्यंतरी मी सोलापूरला गेलो होतो. तिथल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा एक पुरस्कार मला मिळाला. त्यानिमित्ताने एक कार्यक्रम होता. मी, कुटुंब, आप्तेष्ट वगैरे लवाजमा बरोबर होता. त्यामुळे एक चक्कर विजापूरला झाली, एक फेरफटका अक्कलकोटला झाला आणि मी सोलापूर सोडणार इतक्यात मुंबईहून माझा मित्र डॉ. दीपक हट्टंगडीचा फोन आला. बोलता बोलता सोलापूरचा विषय निघाला आणि तो म्हणाला, ‘‘अरे, तिथे आहेस तर डॉ. द्वारकानाथ कोटणीसांचे स्मारक उभारले आहे. फार छान आहे. त्याला भेट देऊन ये. डॉ. कोटणीस ठाऊक आहेत का तुला?’’

‘‘अरे, डॉ. द्वारकानाथ कोटणीस ठाऊक नाहीत असं कसं होईल? पण इथे स्मारक आहे हे मला ठाऊक नव्हतं’’ मी त्याला म्हटलं. कुटुंब, आप्तेष्टांना सोलापुरी चादरींच्या खरेदीत गुंतवून मी तिथल्या पत्रकार मित्रांना घेऊन थेट स्मारकाकडे गेलो. खरं तर मी स्वतःला थोबाडीत मारून घेणार होतो. कारण डॉ. कोटणीसांचं स्मारक सोलापुरात आहे हे मला का ठाऊक नव्हते? जगभरातल्या महान व्यक्तींच्या पाऊलखुणा शोधत मी फिरत असतो आणि आपल्या मातीतल्या सुपुत्राचं स्मारक कुठे आहे, ठाऊक नाही? मी शरमिंदा झालो.

मुंबईत परतल्यावर मी अनेकांना सांगितलं, ‘‘डॉ. कोटणीसांचं काय सुंदर स्मारक सोलापुरात आहे.’’ एखाददोन अपवाद सोडले तर इतरांच्या चेहऱयावरचे भाव ‘‘धवन पस्तीस धावांवर बाद झाला’’ सांगितल्यावर असतील असे होते. थोडक्यात आपल्या आयुष्याशी त्याचा काय संबंध! खरं तर डॉ. कोटणीस अशी व्यक्ती होती की, नाव कानावर पडल्यावर हात जोडले जावेत. एक मित्र म्हणाला, ‘‘त्यांच्यावर एक सिनेमा येऊन गेला ना?’’ तो नुकताच ‘संजू’ सिनेमा पाहून आला होता आणि त्याचं सिनेमाबद्दलचं कौतुक दूध ओसंडून जावं तसं ओसंडून जात होतं.

त्यामुळे स्मारकाबद्दल लिहिण्यापूर्वी डॉ. कोटणीसांबद्दल थोडं सांगायला हवं. त्यांचा जन्म वेंगुर्ल्याचा, ते वाढले सोलापुरात. मुंबईच्या जे.जे.मधून एमबीबीएस झाले आणि पुढच्या पोस्टग्रॅज्युएशनसाठी त्यांना प्रवेश मिळाला. अशा वेळी सर्वसाधारण तरुणांच्या डोळय़ांसमोर काय स्वप्नं असतील? मस्त प्रॅक्टिस, सुंदर बायको, गाडी, बंगला! तो १९३८ चा काळ होता. त्याच वेळी जपानने चीनवर हल्ला केला. ‘क्रौर्य’ या शब्दालाही लाज वाटेल असे अत्याचार जपानने सुरू केले. चीनच्या कम्युनिस्ट नेत्याने जवाहरलाल नेहरूंकडे डॉक्टरांच्या मदतीची विनंती केली. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी वर्तमानपत्रांतून आवाहन केलं. त्या काळात २२ हजार रुपये उभे राहिले. एक ऍम्ब्युलन्स मिळाली आणि डॉ. अटल (अलाहाबाद), डॉ. चोळकर (नागपूर), डॉ. बसू (कोलकाता), डॉ. मुखर्जी (कोलकाता) आणि डॉ. कोटणीस बोटीतून चीनला रवाना झाले. त्यात डॉ. कोटणीस सर्वात तरुण फक्त २८ वर्षांचे! सुखवस्तू स्वप्न सोडून धर्म, देश, पंथ, भाषा यापलीकडे मानवता नावाचा एक प्रांत असतो, तिथे ते निघाले. त्याला चीन, जपान, हिंदुस्थान असं नाव नसतं. तिथे ते जखमी, आजारी मानवाची सेवा करायला निघाले. वाटेत बोटींवर चिनी भाषा शिकले. १९४८ पर्यंत बऱयाचदा युद्धभूमीवर अनेकांचे प्राण त्यांनी वाचवले आणि अतिश्रमाने त्यांना एपिलेप्सी त्रास झाला. त्यात ते गेले. देवाला वाटलं की, वाट चुकून स्वर्गातला एक ‘देव’ खाली माणसांत गेलाय. त्यांनी त्याला वर बोलावून घेतलं तेव्हा त्याचं वय होतं फक्त बत्तीस! कमीत कमी शब्दांत मी डॉ. कोटणीसांबद्दल सांगायचा प्रयत्न केलाय, पण ज्यांना त्यांच्याबद्दल माहीत नाही त्यांनी त्यांच्या बद्दलची पुस्तकं वाचावीत. विशेषतः के. ए. अब्बास या लेखकाने लिहिलेलं (अब्बास हा डावा विचारवंत होता. त्याने अनेक सिनेमाही लिहिले. ‘आवारा’ त्याचाच).

आता स्मारकाबद्दल सांगतो. सोलापूर महानगरपालिकेचं कौतुक करायला हवं की, त्यांनी फार सुंदर स्मारक उभारलंय. सोलापुरात ते जिथे राहिले तिथले घर महानगरपालिकेने विकत घेतले. अतिशय सुंदर, टिपिकल ब्रिटिशकालीन घर आहे. तशा घरात वाढलेल्या मुलाने जखमींची सेवा करण्यासाठी जंगलात जायचा विचार करणं हा व्यावहारिक वेडेपणा होता, पण हा वेडेपणा कुणीतरी करतं म्हणून माणसाचं शरीर धारण केलेले काही तेजस्वी आत्मे बाबा आमटे, डॉ. बंग वगैरेंच्या रूपात आपल्याला दिसतात. डॉ. कोटणीसांची खोली, त्यांची खुर्ची, त्यांनी वापरलेलं सामान वगैरे त्या घरात आहे. ते सर्वच स्मारकात असतं.

इथला महत्त्वाचा भाग आहे, तो त्या काळातले त्यांच्या कार्याचे फोटो. जुने थोडे पिवळे झालेले, पण मानवतावादाचा इतिहास सांगणारे ते फोटो आहेत. त्यांचं कार्य किती कठीण होतं ते कळतं. युद्धभूमीवर फिरत्या दवाखान्यातून जखमी सैनिकांची शुश्रूषा करायची. त्यात औषधांचा तुटवडा. कधी गाडीतून, कधी गाडी ढकलत, कधी चालत फिरायचं. त्यांनी काही ऑपरेशन्स लागोपाठ ७२ तास केलेली आहेत. सुरुवातीला युद्धभूमीवर त्यांनी ८०० जवानांना जीवनदान दिले. पुढे त्यांना डॉ. बेथून इंटरनॅशनल पीस हॉस्पिटलचे डायरेक्टर केले गेले. तेही दुर्गम जागेत होते आणि एक महत्त्वाची गोष्ट. त्यांनी जपानी सैनिकांनाही जीवनदान दिले. त्यांनी तिथल्या एका नर्सबरोबर लग्न केले. त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव यीन हुवा ठेवलं. यीन म्हणजे हिंदुस्थान, हुवा म्हणजे चीन! पण नंतर अतिश्रमामुळे त्यांना एपिलेप्सीचा त्रास होऊन ते ९ डिसेंबर १९४२ रोजी गेले.

चीनमध्ये त्यांचे स्मारक आहे. किंबहुना, चीनच्या हॉल ऑफ फेममध्ये त्यांचे नाव आहे. हिंदुस्थानात आणि चीनमध्ये त्यांचे स्टॅम्प काढले गेले. व्ही. शांतारामांनी त्यांच्यावर सिनेमा काढून त्यांचं कार्य हिंदुस्थानी समाजापुढे आणलं (त्या काळात अशा व्यक्तीवर सिनेमा निघत. आजच्या पिढीचा यावर विश्वास बसणार नाही), पण हे स्मारक मी पाहायला गेलो तेव्हा त्याचं कुलूप उघडलं गेलं आणि निघालो तेव्हा बंद केलं गेलं. याचा अर्थ तिथे कुणी फारसं फिरकत नसावं. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुणाला कोटणीस ठाऊक असणार? उलट तिथला एक नगरसेवक वदला, ‘‘शत्रूला मदत करणाऱया माणसाचं कशाला कौतुक करायचं!’’ अशा बौद्धिक पातळीची माणसं जो समाज निवडून देतो त्या समाजाला डॉ. कोटणीस कुठून ठाऊक असणार! चिनी माणसे त्यांना ‘काळी आई’ म्हणतात. विठ्ठलाला आपण माऊली म्हणतो तसे. सोलापूरहून परतताना मी वाटेत पंढरपुरात आपल्या ‘माऊलीं’च्या पायावर डोकं ठेवलं. मी अनेक मोठय़ा मंदिरांत गेलोय, पण सोवळंबिवळं न घालता. कुणीही गाभाऱयात शिरून देवाच्या पायावर डोकं फक्त विठ्ठलाच्याच ठेवलेलं दिसतय. त्याचं थोडं क्रेडिट साने गुरुजींना जातं. त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दरवाजे दलितांसाठी उपोषण करून खुले केले.

डॉ. कोटणीस जाऊ दे, साने गुरुजी तरी किती जणांना आठवतात देव जाणे! ब्रिटिशांना काही बाबतीत मी लाखोली वाहीन, पण परंपरा जपण्याचे प्रेम आणि त्याचं मार्केटिंग करण्याचं कौशल्य आपण कधी अंगीकारणार?

– [email protected]