
>> अॅड. प्रतीक राजूरकर
कोरकु संस्कृतीतून कोरकु आणि त्यांच्या कुला मामावर प्रेम करणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे अमरावतीच्या प्रतिष्ठत कुटुंबातील दिवंगत रमेशराव उपाख्य बाबासाहेब गणोरकर. कोरकु, वन आणि वाघ यासाठी ते आयुष्यभर जगले. म्हणूनच त्यांना मेळघाटाचा महर्षी ही उपाधी मिळाली. आजच्या जागतिक व्याघ्रदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा.
वन, वनवासी आणि वाघ यांच्यातील ऋणानुबंध प्राचीन काळापासूनचा. वाघाचे सामर्थ्य, शौर्य आणि निसर्गचक्राने बहाल केलेल्या गुणधर्मामुळे वनवासी लोकांची वाघ आपला संरक्षक म्हणूनच धारणा होती म्हणून वनवासी लोकांनी वाघाला देवत्व बहाल केले. शास्त्राrय दृष्टिकोनातून वाघाचे महत्त्व जगाने वाघांची संख्या कमी झाल्यावर मान्य करण्यास सुरुवात केली, पण अशिक्षित आणि मागासलेल्या वनवासी लोकांना वाघाचे महत्त्व प्राचीन काळापासूनच होते म्हणून हिंदुस्थानात अनेक ठिकाणी वाघाची मंदिरे वाघांचे अस्तित्व असलेल्या परिसरात बघायला मिळतात.
मेळघाटातील वनवासी हे मुख्यतः कोरकु समाजाचे आहेत, कोरकु समाजात वाघाला कुला मामा ( कोरकु भाषेत कुला म्हणजे वाघ) असे श्रद्धेने संबोधले जाते. यावरून कोरकु समाजाचे आणि वाघाचे नाते किती घट्ट आहे याची प्रचीती येते. कोरकु संस्कृतीतून कोरकु आणि त्यांच्या कुला मामावर प्रेम करणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे अमरावतीच्या प्रतिष्ठत कुटुंबातील दिवंगत रमेशराव उपाख्य बाबासाहेब गणोरकर. व्यवसायाने जरी शारीरिक शिक्षणाचे शिक्षक होते तरी मनाने मात्र आयुष्यभर ते वन, वनवासी आणि वन्यजीवांचे रक्षक म्हणूनच जगले. मानद वन्यजीव रक्षक म्हणून ते अनेक वर्ष कार्यरत होते.
बाबासाहेबांचा जन्म अंदाजे १९३२-३३ सालचा. गणोरकर कुटुंबाची शेती मध्य प्रदेशातील आठनेर तालुक्यातील अर्धमानी गावात. घरातील ज्येष्ठ पुत्र असल्याकारणाने त्यांचा कोरकु समाजातील लोकांशी संबंध यायचा. त्यामुळे कर्मठ ब्राह्मण कुटुंबातील बाबासाहेबांचे संस्कृत ऐवजी कोरकु भाषा आणि संस्कृतीवर जिवापाड प्रेम. त्याकाळी घरातील सोवळ्याचे संस्कार असूनसुद्धा त्यांच्या समेवत मेळघाटताटील कोरकु पंक्तीत असायचे. बाबासाहेबांचे अध्यात्म कोरकु, वन आणि वाघ हेच होते. कोरकु समाजातील सण, विवाह सोहळे, चालीरीती या सर्वांशी ते इतके एकरूप झाले होते की, ते स्वतःला कोरकुच म्हणायचे. कोरकुंच्या विवाह सोहळ्यातील मंगलाष्टक, विहिणीच्या पंक्ती, गाणी, नृत्य इत्यादी सर्व पद्धती त्यांना अवगत होत्या. कोरकु भाषेतच ते या सर्वांसोबत संवाद साधायचे, त्यामुळे कोरकुंना पण ते आपल्यातील वाटायचे. असे एक रक्तातील नात्यापेक्षा श्रेष्ठ माणुसकीचे नाते त्यांच्यात निर्माण झाले होते आणि स्वाभाविकच कुला मामासोबतसुद्धा!
कोरकुंच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांचा भावनिक सहभाग असायचा. पुढे महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून मेळघाट अस्तित्वात आला. नवीन कायद्याने शासकीय स्तरावर वनवासी आणि शासन यांना समन्वयात अनेक अडचणी येत होत्या. बाबासाहेबांचे कोरकु भाषेवरील प्रभुत्व, दांडगा संपर्क यामुळे वनविभागातील प्रत्येकाला त्यांची आपात्काळात मदत व्हायची. रमेशरावांचे स्पष्ट मत होते कोरकु आणि वाघांवर ज्याचे प्रेम आहे त्यांच्यावर माझे प्रेम आहे; म्हणून कोरकुंच्या भावना शासनस्तरावर आणि शासनाचा कोरकु यातील समन्वय म्हणजे दिवंगत बाबासाहेब.
जंगलांची खडा न् खडा माहिती, वाघाच्या अधिवासाचे संवर्धन व्हावे, वनसंपदा वाढावी म्हणून ते जंगलात जाताना नेहमी झाडांच्या बिया खिशात घेऊन फिरायचे आणि योग्य जागा बघून त्या निसर्गाला अर्पण करायचे. संशोधन वृत्ती आणि व्यासंग यामुळे अधिकारी लेखकांची पुस्तके वाचून माहिती गोळा करून शक्य त्या प्रमाणात अंमलबजावणी करत असत. दुर्गम भागात नियमित पत्रव्यव्हार करून सोबतीला त्यांना उत्तर पाठवण्यासाठी खर्च होऊ नये म्हणून जोडपत्र पाठवून संपर्क ठेवून असत. त्यांना वन पर्यावरणाची माहिती असल्याने त्याकाळी मराठी, इंग्रजी वृत्तपत्रात त्यांचे अभ्यासपूर्ण लेख वाचून वनाधिकाऱयांच्या ज्ञानात भर पडायची. त्याची आठवण निवृत्त क्षेत्रसंचालक पत्की यांनी मेळघाटच्या एका मासिकात ‘मेळघाटचा महर्षी’ म्हणून वर्णन केलेली आहे. विद्यमान वनसंरक्षक रवींद्र वानखेडे दरवर्षी रेंजर कॉलेज येथे प्राचार्य असताना बाबासाहेबांच्या मार्गदर्शनासाठी व्याख्यान आयोजित करायचे.
दिवंगत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या ज्ञानातून शासकीय आणि कोरकु समाजासाठी सामाजिक स्तरावर योगदान दिलेच शिवाय दर आठवडय़ाला कोरकु कुटुंबातील एक सदस्य त्यांच्या घरी काही दिवसांसाठी वास्तव्यास आणत. त्यांचे पालकत्व स्वीकारत.
विद्यमान अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक नितीन काकोडकरांनी ‘ताडोबा ऍन अनटोल्ड स्टोरी’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यातून जे उत्पन्न आले ते त्यांनी मेळघाट फाऊंडेशन आणि ताडोबा फाऊंडेशनला दिले असून ताडोबातील वन कर्मचारी वरघट त्यांची नांदेड येथे हत्या झाली त्यांच्या नावाने आणि मेळघाट येथील उत्कृष्ट कामगिरी करणाऱया वन कर्मचाऱयांना दिवंगत रमेशराव गणोरकर यांच्या नावाने पारितोषिक देण्यास ती वापरण्याच्या सूचना काही वर्षांपूर्वी केल्या आहेत. त्यांच्या साधेपणाची, वन, कोरकु आणि वाघा संबंधित असामान्य कार्याच्या स्मृती आजही मेळघाटात त्यांचा ज्या कुटुंबांसोबत संबंध आला आणि विद्यमान वरिष्ठ वनाधिकाऱयांच्या मनात कायम आहेत. मेळघाटातील तेव्हाचे अनेक वनधिकारी आज वनखात्यात मोठय़ा जबाबदाऱया सांभाळताना मात्र त्यांच्या आठवणीत भरभरून बोलतात.
वन आणि वाघांच्या संवर्धनात रमेश गणोरकरांसारख्या कुला मामाचे भाचे म्हणून तळमळीने कार्य करणाऱया सामान्य व्यक्तिमत्त्वांचा मोठा वाटा आहे म्हणून जागतिक व्याघ्र दिनानिमित्त त्यांच्या या असामान्य कार्याचे स्मरण आणि वनविभागातील पत्की, नितीन काकोडकर, सुनील लिमये, मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचे पहिले संचालक सावरकर ते विद्यमान रेड्डी, रवींद्र वानखेडे, निरंजन विवरेकर यांच्या सारख्या अनेक सन्माननीय वनाधिकायांना बाबासाहेबांचा सहवास लाभला म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. याच व्याघ्र दिनाच्या वन्यजीव प्रेमींना खऱया शुभेच्छा ठरतील.
(संदर्भः पुतणे परीक्षित व आनंद गणोरकर आणि वन विभागातील मान्यवर आजी- माजी अधिकारी)





























































