बिल्डर पळाला, जागा मालकाचा विरोध असला तरी डिम्ड कन्व्हेन्स होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

डिम्ड कन्व्हेन्सची प्रक्रिया तशी किचकटच.. त्यातच जमीन मालकाच्या नाकदुऱ्या काढताना अनेकदा रहिवाशांना नकोसे व्हायचे.. मात्र आता या कटकटीतून सुटका झाली असून इमारत बांधून बिल्डर पळाला किंवा जागा मालकाचा विरोध असला तरी डिम्ड कन्व्हेन्स करता येणार आहे. सहकार तज्ञांनी याबाबतची प्रक्रिया किती सोपी आहे, याची माहितीच आज सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे नवी मुंबईतील हजारो गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विजय नाहटा फाऊंडेशन, समृद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शाश्वत विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने नेरूळ येथे डिम्ड कन्व्हेन्स कार्यशाळेचे आयोजन केले होते. डिम्ड कन्व्हेन्सवर बिल्डर, जागा मालक आणि सिडकोचे अधिकारी स्वाक्षरी करीत नसतील तर गृहनिर्माण संस्थांनी उपनिबंधकांकडे सात नमुना अर्ज सादर करून या तिघांची नावे त्यामध्ये नमूद करायची आहेत. त्यानंतर उपनिबंधक सुनावणीसाठी या तिघांना बोलवतो आणि तीन महिन्यांनंतर या तिघांच्या वतीने डिम्ड कन्व्हेन्सवर स्वतः स्वाक्षरी करतो, अशी माहिती महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी दिली. यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा, सहकार कायदा तज्ञ विनोद संपत, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, दिलीप घोडेकर, मिलिंद सूर्यराव, शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक काशीनाथ पवार, उपशहरप्रमुख संजय जाधव, सुनील चौधरी उपस्थित होते.

– शिवसेना मार्गदर्शन केंद्र सुरू करणार

सोसायटय़ांचे डिम्ड कन्व्हेन्स करण्यासाठी संबंधित पदाधिकाऱ्यांना कायदेविषयक सल्ला देण्यासाठी शिवसेना येत्या ५ ऑगस्टपासून मार्गदर्शन केंद्र सुरू करणार आहे, अशी माहिती याप्रसंगी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी यावेळी दिली.