विठूरायाच्या चरणी तीन कोटीचं दान, गतवर्षीपेक्षा मोठी वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनील उंबरे । पंढरपूर

आषाढीवारीसाठी देशभरातून आलेल्या भाविकांनी विठूरायाच्या चरणी कोट्यवधींचे दान वाहिले आहे. विठ्ठल रूक्मिणीच्या चरणी २ कोटी ९० लाख ४४ हजार ६४१ रूपयाचं दान जमा झाले असल्याची माहिती विठ्ठल-रूक्मिणी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांची दिली आहे.

विठ्ठलाच्या पायावर ३६ लाख ३७ हजार ५०९ रूपये, रूक्मिणी मातेच्या पायावर ६ लाख ९३ हजार ६२४ रुपये, अन्नछत्र देणगीमधून ११ हजार ९५५ रूपये, देणगी पावती मधून १ कोटी ६० लाख १२ हजार ५५० रूपये, बुंदीलाडू प्रसाद विक्रीमधून ५ लाख ३८ हजार ४७० रूपये, राजगीरा लाडू प्रसाद विक्री मधून ५ लाख ६४ हजार ५०० रूपये, फोटो विक्रीतून ९५ हजार ४७५ रूपये, भक्तनिवासमधून ३ लाख १६ हजार ६०५.रूपये, नित्यपूजेतून १ लाख ५० हजार, हुंडीपेटी १८ लाख ९२ हजार २२२ रूपये, ऑनलाईन देणगी मधून २ लाख ९ हजार ८६२ रूपये आणि अन्य स्वरूपात ४ लाख २१ हजार ८६९ रूपये असे एकूण २ कोटी ९० लाख ४४ हजार ६४१ रुपये जमा झाले आहेत. गतवर्षी २ कोटी ६८ लाख ९६ हजार ५१४ रूपये उत्पन्न मिळाले. यामध्ये २३ लाखांची वाढ झाली आहे.

यावर्षी विठ्ठल-रूक्मिणीचे १५ जुलै पासून २४ तास दर्शन सुरू करण्यात आले. त्यानंतर २८ जुलै गुरूपौर्णीमेपर्यंत ७ लाख भाविकानी विठ्ठल-रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेतले तर ११ लाख भाविकानी मुखदर्शन घेतले आहे. या वर्षी अधिक महिन्यात साधारणपणे तीस लाख भाविक येऊन गेले. असे असतानाही आषाढीला विक्रमी गर्दी झाली होती. जवळपास अठरा लाख भाविकानी विठोबाचे दर्शन घेतल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.