कपिलदेव २४ वर्षांनंतर पुन्हा हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी क्रिकेट संघाला पहिला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कपिलदेव तब्बल २४ वर्षांनंतर पुन्हा एकदा हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, आता ते क्रिकेट नव्हे, तर गोल्फ या खेळाच्या माध्यमातून मैदानावर उतरणार आहे.

जपानमध्ये १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान होणार्‍या आशिया पॅसिफिक सीनियर गोल्फ स्पर्धेसाठी कपिल देव यांची हिंदुस्थानी संघात निवड करण्यात आली आहे. रिशी नरिन आणि अमित लुथरा या खेळाडूंसोबत कपिल देव गोल्फच्या मैदानात कौशल्य पणाला लावताना दिसतील. आशिया पॅसिफिक सीनियर गोल्फ ही स्पर्धा ५५ वयाच्या पुढील खेळाडूंसाठी आयोजित केली जाते. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर देशाची मान उंचावणारे कपिल देव गोल्फच्या मैदानावरही अशीच खेळी करणार काय? याकडे तमाम देशवासीयांचे लक्ष असेल. कपिल देव यांनी १९९४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निकृत्ती स्विकारली होती.

पुन्हा एकदा हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करताना सहाजिकच आनंद होतोय, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया कपिल देव यांनी दिली. क्रिकेटमधून निकृत्ती स्विकारल्यानंतर कपिल देव यांनी गोल्फकडे आपला मोर्चा वळवला. दिल्ली गोल्फ क्लबमध्ये ते गोल्फचा सराव करत असतात.