हिंदुस्थानींना लागलंय ‘किकी चॅलेंज’चं वेड!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

इंटरनेटच्या जमान्यात कधी कुठली गोष्ट ट्रेंड म्हणून व्हायरल होईल सांगता येत नाही. अशा ट्रेंडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असतात ते म्हणजे चॅलेंज. काही काळापूर्वी एका चांगल्या कारणासाठी आईस बकेट चॅलेंज लोकप्रिय झालं होतं. आता अशाच एका चॅलेंजने धुमाकूळ घातला असून किकी चॅलेंज नामक हा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय होतोय.

किकी चॅलेंजमध्ये कॅनेडियन रॅपर ड्रेक याच्या स्कॉर्पियन या अल्बममधील गाण्यावर नाच करायचा असं आहे. पण, थांबा हे चॅलेंज फक्त इथेच थांबत नाही. चालत्या गाडीतून उतरायचं आणि दरवाजा उघडा ठेवून गाडीच्या धीम्या वेगासोबत नाचायचं, असा हा ट्रेंड आहे. ड्रेकच्या मूळ इन माय फीलिंग्ज या गाण्यात असं कोणतंही नृत्य नाही. पण, नेटकऱ्यांच्या सुपीक डोक्यातून या चॅलेंजचा जन्म झालेला आहे.

या चॅलेंजचं वेड सगळीकडे पसरत असून आतापर्यंत नोरा फतेही, अदा शर्मा, वरुण शर्मा यांनी या चॅलेंजवर नृत्यही केलं आहे. नोरा फतेहीने तर या चॅलेंजला देसी रूप दिलं आहे. अभिनेता वरुण शर्मा याच्यासोबत साडी नेसून रिक्षातून उतरून हे चॅलेंज पूर्ण केलं. गंमत म्हणजे या वेळी रिक्षा कुणीही चालवत नव्हतं तर रिक्षाला मागून धक्का देऊन चालवलं गेलं होतं. हे व्हिडीओ नेटवर तुफान लोकप्रिय होत असून त्याची गमतीशीर व्हर्जन्सही व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे या चॅलेंजमुळे लोकांचे जीव धोक्यात टाकू नका, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून या चॅलेंजमुळे होऊ शकणाऱ्या अपघाताचा इशाराही दिला आहे.

Netizens mad over KIKI challenge. videos are going viral and mumbai police advised not to do such stunts.