कंपनीचा “पत्त्याच” नाही ,पण बँक खात्यात ३,१७८ कोटी जमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। हैदराबाद

कंपनीचा पत्ता बोगस आणि तिचा ठावठिकाणाच नाही अशा स्थितीत असलेली एक कंपनी सध्या सरकारच्या निशाण्यावर आहे .या कंपनीच्या नावे असलेल्या बँक खात्यात नोट बंदीनंतर ३,१७८ कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम जमा करण्यात आली आहे.या माहितीनंतर केंद्राच्या सिरीयस फ्रॉड इन्वेस्टीगेशन ऑफिसने (एसएफआयओ ) कसून तपासाला सुरुवात केली आहे. ड्रीमलाईन मॅनपॉवर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ( नित्यांक इंफ्रापॉवर अँड मल्टिव्हेंचर्स नवे नाव) अशा नावाने कंपनीचा अवैध कारभार सुरू होता.

एका प्रमुख इंग्रजी दैनिकाच्या प्रतिनिधीने या कंपनीच्या एर्रागड्डा येथील पत्त्यावर जाऊन माहिती काढली असता अशी कोणतीही कंपनी दिलेल्या पत्त्यावर नसल्याचे समजले. पट्ट्यातील एन .सिद्धाप्पा निलायम इमारतीत फक्त निवासी नागरिकांचेच वास्तव्य आहे. तिथल्या आजूबाजूच्या नागरिकांनीही अशी कंपनी अस्तित्वात नसल्याचे सांगितले.

बोगस कंपनीवर १७०० कोटींचे कर्ज

ड्रीमलाईन मॅनपॉवर सोल्युशन्स या अस्तित्वातच नसलेल्या कंपनीवर १७०० कोटी रुपयांचे कर्ज आहे.त्यातील बराचसा हिस्सा येस बँकेकडून उचलण्यात आला आहे. नोटबंदीनंतर वर्षभरात वाणिज्य व्यवहार मंत्रालयाने ( कॉर्पोरेट अफेअर्स ) १५ नोव्हेंबर २०१७ला एक आदेश जारी करून बोगस कंपन्यांची चौकशी सुरु केली होती. त्यात १८ कंपन्यांनी नोटबंदीनंतर १०० कोटी रुपयांची उलाढाल आपल्या खात्यातून केल्याचे उघड झाले. त्यानंतर एसएफआयओकडून १८ बोगस कंपन्यांची चौकशी सुरु झाली आहे , असे वाणिज्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.