
सामना ऑनलाईन, किनवट
किनवट तालुक्यातील घोगरवाडी भागात अस्वलाने केलेल्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू झाला आहे. सुंगा मडावी (वय-६० वर्षे) असं गुराख्याचे नाव आहे. सुंगा यांना सोडवण्यासाठी गेलेल्या त्याचा दोन मुलांसह ६ जणांनाही अस्वलाने जखमी केले आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
३१ जुलै रोजी संध्याकाळी गुरे चारायला जंगलात गेलेल्या सुंगा यांच्यावर अस्वलाने हल्ला केला होता. अस्वलाने हल्ला केल्याचे बघताच सुंगा यांच्यासोबत असलेल्या कलावतीबाई वेट्टी या महिलेने धावत गावात जाऊन याबाबत माहिती दिली. अस्वलाच्या हल्ल्याच सुंगा यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अस्वलाने सुंगा यांच्या मृतदेहाच्या आसपास कोणालाही फिरकू दिलं नाही. जो सुंगा यांचा मृतदेह तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा, त्यावर अस्वल हल्ला करत होतं. यात सुंगा यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सुंगा यांचा दुसरा मुलगा गुलाब मडावी, गणपत गेडाम, नारायण मडावी, राजु पेंदोर हे अस्वल हल्ल्यात किरकोळ जखमी झाले आहेत.



























































