
सामना ऑनलाईन, मुंबई
धारावी, शाहूनगर परिसरात नशेबाजांना गांजाची विक्री करणाऱ्या मुख्य सप्लायर महिलेला शाहूनगर पोलिसांनी १२ किलो गांजासह रंगेहाथ पकडले. तिला गांजाची तस्करी करण्यात मदत करणाऱ्या टॅक्सीचालकाच्यादेखील मुसक्या आवळल्या आहेत. ललिता कमल नागपाल (४३) असे तिचे नाव आहे. धारावी, शाहूनगर परिसरात गांजाचा सप्लाय ती करते. मंगळवारी दुपारी ती इस्माईल नगरी (२३) याच्या टॅक्सीतून गांजाचा साठा घेऊन माटुंगा लेबर कॅम्प येथील सेंट्रल रेल्वे कॉलनी परिसरातल्या जिम गार्डन येथे येणार असल्याची खबर अंमलदार भोसले यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आरोसकर, पीएसआय तुकाराम डिगे, अंमलदार भोसले, पडवळ, भिल्लारे, पठाण या पथकाने जिम गार्डन परिसरात सापळा लावला. ललिता १२ किलो गांजा इस्माईलच्या टॅक्सीतून तेथे घेऊन येताच पोलिसांनी तिच्यावर झडप घातली आणि गांजासह टॅक्सी जप्त केली.
आईसह मुलगा आणि सूनही धंद्यात
ललिताबरोबर तिचा मुलगा अजय आणि सूनदेखील गांजाची तस्करी आणि विक्री करण्याचे काम करतात. नाशिकहून गांजाचा साठा मुंबईत आणला जातो. त्यानंतर तस्कर सांगतील त्या पिकअप पॉइंटवरून ललिता तिला हवा तेवढा गांजाचा साठा घेऊन येते. मग घरात संपूर्ण कुटुंब पाच ग्रॅमच्या पुडय़ा बनवून मग त्या १०० रुपयांत नशेबाजांना विकतात असे पोलिसांनी सांगितले.




























































