ठसा : सुधा नरवणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रशांत गौतम

‘आकाशवाणी  पुणे, सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत’ अशा बहुपरिचित आवाजाने असंख्य श्रोत्यांना सकाळी सातच्या बातम्या ऐकण्याची सवय लावणार्‍या सुधा नरवणे गेल्या. नरवणे यांनी तब्बल एक दशक आकाशवाणीसाठी निवेदक म्हणून कार्य केले. पुणे आकाशवाणी केंद्रावरील सकाळी सातच्या प्रादेशिक बातम्यांमधील त्यांचा आवाज श्रोत्यांना ओळखीचा झाला होता. बातमीपत्र वाचण्याची त्यांची एक शैली होती. त्यांचा म्हणून आवाज होता. त्यामुळे  प्रादेशिक बातम्या वाचतानाही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडली. एवढेच नाही तर, आकाशवाणीच्या कारकीर्दीमध्येही त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली.

वृत्तपत्रे छपाईला गेल्यानंतर रात्री उशिरा घडलेल्या बातम्यांची नोंद प्रादेशिक वार्तापत्रात घेतली जात असे. दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्र घरात येईपर्यंत सुधा नरवणे यांनी सांगितलेल्या बातम्यांवर चर्चा होत असे. रोज पहाटे पाच वाजेच्या सुमारास पुणे आकाशवाणी केंद्रात वेळेत हजर राहणार्‍या नरवणे यांच्याबद्दल कर्मचार्‍यांतही जरब होती. कामात असलेली कमालीची शिस्त आणि बिनचूक वेळ पाळण्याची सवय त्याचप्रमाणे भाषेवर असलेले प्रभुत्व, आवाज अलिप्त ठेवण्याचा तटस्थपणा या गुणविशेषांमुळे बातमीपत्र श्रवणीय होत असे. एवढेच नाही तर सकाळी सात वाजून पाच मिनिटांच्या बातम्यांचे वाचन करताना एखादी महत्त्वाची बातमी आली तर त्या क्षणभरही विचलित होत नसत. फीडरसमोर आलेल्या बातम्यांची मनात जुळवाजुळव करीत वाट्याला आलेला कसोटीचा क्षण पार पाडत असत. अशा अनेक प्रसंगांना सुधाताई सामोर्‍या गेल्या आणि यशस्वीही झाल्या. केवळ आवाज हीच त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती, जी त्यांनी शेवटपर्यंत जपली.

नभोवाणीवर काम करताना निवेदकांचा आवाज सुस्पष्ट असला पाहिजे, शैली असली पाहिजे आणि ती प्रत्येक निवेदकासाठी आवश्यक बाब होती. सुधाताईंना त्याचे भान नेहमी होते. आकाशवाणी पुणे केंद्रावरच्या सात वाजून पाच मिनिटांच्या बातम्या आणि सुधा नरवणे यांचे एक वेगळेच नाते जुळले होते.

सुधा नरवणे यांनी तरुण वयातच लेखनास प्रारंभ केला. लघुकथा, लघुनिबंध, ललित लेखनासह त्यांनी सशक्तपणे अनुवादाचेही कार्य केले. इंद्रधनू ते अठरा सेकंद, लामणदिवा, जननी : माता, कन्या, मातृत्व, इतवा मुंडाने लढाई जिंकली (आदिवासी जीवनावरील कथा व अनुवाद) अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. आदिवासी जीवनावर आधारित असलेल्या कथासंग्रहात नरवणे यांनी वंचित घटकाची अवस्था खूप प्रभावीपणे मांडली आहे. एवढेच नव्हे तर स्त्रियांच्या वेगवेगळ्या भूमिकांचे प्रत्ययकारी चित्रण केले. म्हणूनच हा संग्रह सखोल वास्तववादी आहे. सत्यकथा, किर्लोस्करमधून त्यांनी वैविध्यपूर्ण लेखन केले आहे. राज्य पुरस्कारासोबत अन्य महत्त्वाचे पुरस्कार त्यांना लाभले होते. उत्तम निवेदिका आणि दर्जेदार साहित्याच्या कसदार लेखिका असा त्यांचा जीवनप्रवास ८८व्या वर्षी थांबला.