
सामना प्रतिनिधी । नागपूर
मित्राच्या आईच्या अस्थीविसर्जनासाठी गेलेले ४ जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी चंद्रपूर जवळ घडली. परंतु वेळीच मदत मिळाल्याने दोघांना वाचवण्यात यश आले, तर दोघांचा शोध सुरू आहे. केतन भोजराज पोटदुखे (२०), विक्की शंकर माहुलीकर (२७), उत्तम सातोबा टेकाम (३८), नैनेश शाहा (२७) अशी या चौघांची नावे आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस शहराजवळ असलेल्या वर्धा, पैनगंगा आणि निर्गुडा नदीच्या त्रिवेणी संगम असलेल्या वढा तीर्थक्षेत्र येथे चंद्रपूर येथील रहिवासी नितीन गोवर्धन यांची स्व.चंद्रभागा शंकर गोवर्धन यांच्या अस्थीसर्जनासाठी जवळपास २५ ते ३० लोक गेले होते. यातील बाबुपेठ येथील रहिवासी असलेले केतन, विक्की, उत्तम, आणि नैनेश हे चौघे अस्थीविसर्जनानंतर आंघोळीला हे नदीपात्रात उतरले होते. परंतु पाण्याच्या प्रवाहामुळे चौघेही वाहून गेले. परंतु त्तम सातोबा टेकाम व नैनेश शाहा यांना उपस्थित लोकांच्या मदतीने वाचविण्यात आले. इतर दोघांना वाचवण्यासाठी चंद्रपूर येथील पोलीस विभागाद्वारे शोधकार्य सुरू करण्यात आले. परंतु अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. असून पुढील तपास घुग्गुस पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले पिएसआई राहुल ठेंगने व यांच्या चमू मार्फत सुरू आहे.































































