
सामना ऑनलाईन । पुणे
मराठा समाजासोबत इतर समाजाच्याही आरक्षणाचा निर्णय एकदाच घ्या ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलेली भूमिकाच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील मांडली. मराठा-धनगर-मुस्लीम या सर्वांसाठीच्या आरक्षणाचा निर्णय एकत्र आणि तत्परतेने घ्यावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मांडली.
पुणे येथे झालेल्या पत्रकारपरिषदेच्यावेळी त्यांनी मराठा आंदोलनावर आपलं मत अगदी स्पष्ट शब्दात मांडलं. ‘सर्वोच्च न्यायालयाकडून अॅट्रॉसिटीच्या कायद्यातील काही अटी शिथिल करण्यात आल्या होत्या. मात्र केंद्र सरकारने कालच अॅट्रॉसिटीचा कायदा पूर्ववत ठेवणार असं स्पष्ट केलं. तर देशभरातील व्यथित, उपेक्षित ज्यांना आरक्षण हवं आहे अशा मराठा-धनगर-मुस्लीम-जाट सगळ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने अॅट्रॉसिटीसाठी दाखवलेल्या तत्परतेनेच आरक्षण द्यावं’, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
‘गेले २५-३० वर्ष हा प्रलंबित आहे. आधी ५८ मूक मोर्चे निघाले. त्याची देखल जगभरात घेतली गेली. तेव्हाच हा प्रश्न सोडवला असता तर ही वेळ आली नसती. तुम्ही लोकांच्या भावना समजून घ्या, असंही ते म्हणाले. या आंदोलनाला राजकारणाशी कृपया जोडू नका. आंदोलनासाठी कुणीतरी प्रवृत्त करतं आहे, असं म्हटलं जात आहे. मात्र आंदोलकांना कुणी प्रवृत्त केलं नाही. आज या समाजावर वेळच अशी आली आहे, की याच्याशिवाय पर्याय नाही’, अशा शब्दात त्यांनी समाजाची व्यथा मांडली.
‘आता जे सत्तेत आहे आणि विरोधक आहेत या सर्व राजकारण्यांनी माणुसकीच्या नात्यानं समजून घेणं आवश्यक आहे’, असं ते म्हणाले. ‘सरकारनं प्रस्ताव द्यावा, आम्ही त्याला संपूर्ण सहकार्य करू असं विरोधक म्हणतात, मग हे आधी का झालं नाही. असा प्रश्न आता लोकं विचारत आहे. त्याचं उत्तर आपल्याला द्यायला हवं’, असंही त्यांनी सांगितलं.
आरक्षण का दिलं नाही याची दोन कारणं…
दररोज वर्तमानपत्र वाचून कळतं की आरक्षणास कोणाची काही हरकत नाही. असं असताना मग अनेक वर्ष हा प्रश्न का सोडवला गेला नाही. हा त्यांच्या मनात जो प्रश्न तोच माझ्या मनात आहे. मला दोन कारण दिसतात. एक म्हणजे इच्छा शक्ती नाही, दुसरं म्हणजे आजपर्यंत घडलेलं राजकारण, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शासनाची भूमिका किती योग्य?
आत्महत्या करणाऱ्या मराठा आंदोलकांच्या प्रश्नावर तोडगा काय तर शासनाची रक्कम द्याची, कुटुंबातील एकाला नोकरी द्या. हा कुठाला न्याय?, असा सवाल त्यांनी यावेळी केला. आरक्षण असतं तरी ही वेळ आली नसती, आत्महत्या करावी तरच पैसे-नोकरी मिळेल असं म्हणणं कितपत योग्य, असंही ते म्हणाले.
पुढील दिशा ठरवू!
उद्या पुण्यात सर्व जिल्हा समन्वय समितीची बैठक घेऊ. त्यात पुढील दिशा ठरवू. आंदोलनावेळी मालमत्तेचं नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यास सांगू असं त्यांनी सांगितलं.
व्हिडीओ:
- मराठा, धनगर, मुस्लीमांना सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे
- दररोज वर्तमानपत्र वाचून कळत कोणाची काही हरकत नाही, कोणची हरकत नाही मग अनेक वर्ष हा प्रश्न का सोडवला गेला नाही, त्यांच्या मनात जो प्रश्न तो माझ्या मनात आहे
- एक म्हणजे इच्छा शक्ती नाही, दुसरं म्हणजे आजपर्यंत घडलेलं राजकारण
मराठा, धनगर, मुस्लीमांना यांना आरक्षण मिळालं पाहिजे - अॅट्रॉसिटीसाठी जी तत्परता दाखवली तिच तत्परता केंद्रांना दाखवावी
- संपूर्ण आरक्षणाचा मागीच मार्गी लागला असता तर आज मराठा कुटुंब रस्त्यावर आली नसती
- आत्महत्या केलेल्यांच्या दु:खात सहभागी आहोत
- सरकारचा तोडगा काय शासनाची रक्कम द्याची, नोकरी हा कुठाला न्याय
- आरक्षण असतं तरी ही वेळ आली नसती
- आत्महत्या करावी तर पैसे-नोकरी मिळेल असं म्हणणं कितपत योग्य
- उद्या पुण्यात जिल्हा समन्वय समितीची बैठक घेऊ, दिशा ठरवू, मालमत्तेचं नुकसान होऊ नये यावर विचार करू
- या लोकांना आरक्षण का दिलं गेलं नाही? हा प्रश्न सर्व लोकप्रतिनिधींना विचारा






























































