
सामना ऑनलाईन । अंबड
अंबड येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत एक महिन्यापासून नाही. तसेच अडीच महिन्यापासून शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या फाईल्स प्रलंबित असून बँकेचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन तारीख पे तारीख सांगून शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणत आहेत. बोंडअळी अनुदानाची संपूर्ण यादीसुद्धा अजून जाहीर केलेली नाही. सध्या शेतकऱ्यांना पिकांसाठी कीटकनाशके, खते वगैरेंची नितांत गरज असताना बँक मात्र टाळाटाळ करत आहे.
पंधरा दिवसांपूर्वीच प्रहार शेतकरी संघटनेने मॅनेजर नसल्यामुळे ‘रास्ता रोको’ आंदोलन करून तहसीलदार दत्ता भारस्कर यांना यासंदर्भात निवेदन ही दिले. परंतु अजूनही व्यवस्थापक उपलब्ध नसल्यामुळे प्रहार शेतकरी संघटनेचे प्रदीप शिंदे, विकास आधे, प्रभू बाह्मणे, रामेश्वर आरगडे, गोविंद सावंत आदींनी व्यवस्थापकाच्या खुर्चीला बेशरमाचा हार घालून निषेध व्यक्त केला. दोन दिवसांत शाखा व्यवस्थापक बँकेत रूजू न झाल्यास बँकेला कोणत्याही क्षणी टाळे ठोकण्याचा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे प्रदीप शिंदे यांनी दिला आहे.
































































