मराठा आरक्षणासाठी तरूणाची विष प्राशन करून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नांदुर्गा

पदवीचे शिक्षण पूर्ण करूनही केवळ आरक्षण नसल्यामुळे नोकरी नाही. त्यामुळे नैराश्य आलेल्या नांदुर्गा येथील सुमित नावाच्या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बुधवार दि.१/८/२०१८ रोजी विष प्राशन केले होते. गुरूवारी दुपारी त्याचा उपचरादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान मराठा आरक्षण जाहीर करावे, मयताच्या कुटुंबीयाना २५ लाखाची मदत द्यावी व कुटुंबातील एका सदस्याला शासन सेवेत घ्यावे या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा व मयताच्या कुटुंबीयानी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिल्याने कांही काळ तणाव निर्माण झाला होता.

सुमित याने बीएस्सी पदवीचे शिक्षण व डीएमएलटीचा कोर्स पूर्ण केला आहे. त्याची बहिण बीएस्सीचे शिक्षण घेत आहे. तर त्याच्या भावाचे बी.एच.एम.एस.चे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्याची आई गृहिणी असून वडील विलास सावळसुरे यांच्या नावावर ९ एकर शेतजमीन आहे. मुलांचे शिक्षण व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी विलास सावळसुरे यांनी सुमारे २५ लाखांचे कर्ज काढले आहे.