भटकेगिरी : दुर्लक्षित वारसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

मध्यंतरी मी स्पेन-पोर्तुगलला जाऊन आलो. त्याबद्दल लिहायचच आहे. पण तिथून आल्यावर हिंदुस्थानात एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली की एक तर तळपायाची आग मस्तकात जाते किंवा एकंदरीत आपल्या ऐतिहासिक वास्तूंची स्थिती पाहून हृदयात कळ येते. कारण दिल्ली-आग्र्यातील चार स्थळं सोडली तर ऐतिहासिक वारसा कसा जपावा यापेक्षा त्याची माती कशी करावी यातलं आपलं कसब मोठं आहे. अलीकडे विजापूरला जाऊन आल्यावर वर उल्लेखलेल्या दोन्ही प्रतिक्रियेतून मी गेलो. अरे हो, एक गोष्ट आपल्याला जमून जाते. शहरांची नाव बदलणं. ते बदललं की “आपण वारसा जपला’’ हे समाधान मिळतं. खरं तर मिळण्यापेक्षा ते ‘मिटवणं’ हे आपल्याला जास्त आवडतं.

विजापूरचे नाव आज विजयपूर आहे. कारण दहाव्या आणि अकराव्या शतकात ‘चालुक्यां’नी शहराचे नाव विजयपूर ठेवलं. पुढे ते शहर यादवांकडे गेलं. नंतर खिलजी, सलतनत, मग बहामनीकडे ते आलं. मुस्लिम राजवटीबरोबर ते नाव बिजापूर (आपण विजापूर म्हणतो) झालं. मग आदिलशाही आली. ती तिथे जवळजवळ १९६ वर्षे होती. मग औरंगजेबाने जिंकलं. तो गेल्यावर हैदराबादच्या निजामाने डल्ला मारला. त्यांच्याकडून ‘मराठय़ांनी’ खेचून घेतले. १८१८ मध्ये पेशवाईचा अंत झाला. विजापूर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने जिंकलं. त्यांनी ते मराठय़ांच्या सातारा गादीला जोडले आणि नंतर स्वतंत्र हिंदुस्थानात ते कर्नाटकाचा भाग झाले. १ नोव्हेंबर २०१४ ला ते विजयपूर झालं.

ते विजयपूर होणं मान्य. मूळ नाव परत दिलं. पण फक्त नावाची पाटी बदलली. इतिहासाकडे पाहण्याची अनास्था तीच राहिली. त्या शहरात हायवेवरून आम्ही कुठल्या आडरस्त्याने शिरलो मला ठाऊक नाही. गोल घुमटाचा वेध घेत आम्ही शिरलो. पण आपण ऐतिहासिक गावात आल्याची जाणीवच होत नव्हती. ‘स्वच्छ भारत’ नावाची मोहीम गेली चार वर्षे सुरू आहे, त्याची साधी बातमीसुद्धा शहरात पोहोचली आहे असं वाटत नव्हतं. ती राबवणं ही खूप पुढची गोष्ट आहे. गोल घुमटाजवळ दोन-चार टांगेवाले, शहरातली ऐतिहासिक स्थळं फिरवण्याचे जोरदार मार्केटिंग करत होते. त्यातला एक आम्ही पकडला. खरं तर त्याने आम्हाला पकडले. दीड-दोन तासांत त्याने शहरातल्या ऐतिहासिक वास्तू फिरवून आणल्या. तोच आमचा सारथी तोच गाईड. एक गोल घुमट सोडला आणि थोडय़ा प्रमाणात मुलुखमैदान तोफेची जागा, तर इतर स्थळे इतकी ‘पोरकी’ वाटली की त्यांच्यासाठी ऐतिहासिक वास्तू या अनाथाश्रम कुणीतरी उघडावा असं मला वाटलं.

मनातल्या मनात ते शहर नीट ऐतिहासिक बनवण्यासाठी मी इंग्लंड, इटली, फ्रान्स, स्पेनला दिलं आणि बघता बघता मला ते स्वच्छ, सुंदर, जगाने येऊन पहावं असं वाटायला लागलं. टांग्याची जागा, मोठमोठय़ा बांगामध्ये लहान मुलांसाठी, फिरण्याची गाडी असते त्या गाडीने घेतलेली दिसली. त्याहून हौसेने २५-३० पर्यटक ऐतिहासिक स्थळांना भेट देत फिरताना दिसली. त्यांच्याबरोबर गाईडस् दिसले. अगदी कोलमडलेल्या अवस्थेतली ऐतिहासिक स्थळं (त्यांना तिथे प्रेमाने रुईन्स (Ruins) म्हणतात) स्वच्छ आंघोळ करून नवे कपडे घालून पाहुण्यांचं स्वागत करताना दिसली. त्या काळातल्या स्थापत्य शास्त्र्ाज्ञ आर्किटेक्चर, विविध संस्कृतीचं कौतुक गाईडच्या शब्दांतून ओसांडून वाहताना दिसलं. शॉपिंगसाठी छोटी छोटी दुकाने आठवण म्हणून घेऊन जायच्या छोटय़ा वस्तूंनी भरलेली दिसली. देशी-परदेशी पर्यटक आनंदात खरेदी करताना दिसले.

या स्वप्नातून बाहेर आलो आणि पुन्हा धुळीने माखलेले गलिच्छ रस्ते, दुर्लक्षिलेली स्थळं आणि एकंदरीत अनास्थेच्या व्यावहारिक जगात मी परतलो. तिथल्या वास्तूंची दुरवस्था मन विषण्ण करून गेली. काय काय सांगू?

तिथे प्रचंड मोठी जुम्मा मशीद आहे. दख्खनमधली सर्वात मोठी मशीद चारशे फूट बाय दोनशे ऐ्रंशी फुटांची. त्याला२२५० कमानी आहेत. त्यावर सोन्याच्या लेपाने कुराणातले उतारे लिहिले आहेत. अजून तिथे नमाज पढला जातो, पण अवस्था दुर्लक्षितच वाटली. बारा कमानी, शहराचे बुरुज, इतर महाल हे भग्नावस्थेत वाटतात. त्यात दोन वास्तू अशा आहेत त्या पाश्च्यात्य जगाने मिटवून धंदा केला असता. एक मुलुखमैदान तोफ, दुसरी गोल घुमट!

आमच्या गल्लीतले देशपांडे आपल्या बायकोला मुलुखमैदान तोफ म्हणत तेव्हा मला या तोफेचं महत्त्व कळलं. माझं लग्न झाल्यावर देशपांडे मला द्रष्टे वाटायला लागले. ५५ टनाची चौदा फूट चार इंच लांबीची जवळपास पाच फूट व्यासाची ही तोफ आहे. तांबे, लोखंड, जस्ताच्या मिश्रणातून ही नगरला तयार झाली. ती विजापुरात आणताना शंभर बैल, दहा हत्ती आणि शेकडो माणसांनी ओढली. त्या तोफेच्या तोंडावर सिंह चित्तारलाय. त्याने जबडय़ात हत्ती चिरडलाय असं दाखवलंय. असं म्हणतात की तोफेत ती दारू पेटल्यावर ती पेटवणारा माणूस पाण्याच्या टाकीत पाण्याखाली लपायचा आवाजाने कानाचे पडदे फाटू नयेत म्हणून! गंमत म्हणजे ही तोफ सूर्यप्रकाशात थंड राहते आणि त्यावर टिचकी मारली की घंटा वाजल्याचा आवाज येतो. ही तोफ इंग्लंडमध्ये असती तर कौतुकाचे पाट वाहिले असतेच आणि त्याचे असं मार्केटिंग त्यांनी केलं असते की प्रत्येक टूरसाठी ते आकर्षण ठरलं असतं आणि एखाद्या टूरने वगळलं असतं तर “इतकी महत्त्वाची गोष्ट तुम्ही कशी वगळता?’’ (एवढे पैसे घेऊन ही गोष्ट मनातल्या मनात म्हणत) विचारणारी माणसं मराठी असती.

गोल घुमट आश्चर्य आहे. व्हॅटिकनमधल्या सेंट पीटर्स कॅथेड्रियलचा घुमट जगातला सर्वात मोठा घुमट आहे. तो पहाताना आश्चर्य वाटतं की कसा बांधला असेल? त्याचा गाईड तर ती गोष्ट चमत्काराच्या स्तरावर नेऊन ठेवतो. अहो, गोल घुमटाचा घुमट फक्त त्याखालोखाल मोठा आहे हे कितीजणांना ठाऊक आहे? नसणारचं. कारण तो युरोपमध्ये थोडाच आहे? तिथे आत आपण बायकोचं नाव उच्चारलं तर ते सातवेळा आपल्याला ऐकू येतं. अर्थात तुम्हाला कुणाचं नाव घ्यायचं हा तुमच्या प्रश्न आहे. मी बायकोचं घेतलं आणि हो भीतीपोटी नाही. वरच्या व्हिस्परिंग गॅलरीत बसलात, डायमेट्रिकली विरुद्ध बाजूच्या माणसाला म्हणजे सदतीस मीटर दूर असलेल्या जागेवर टाचणी पडल्याचा आणि तुम्ही रोमॅण्टिक मूडमध्ये असाल तर चुंबनाचा आवाज बाजूला बसून ऐकल्यासारखा येतो. रोमने या वास्तू मिरवल्या असत्या. आपण त्याचे काय मार्केटिंग करतो? युरोपकडून आपण नग्नता, मोकळेपणा, बिनधास्तपणा, खाणं-पिणं घेतो. कधीतरी हा वारसा नीट जपण्याची गोष्टही घेऊ या ना!

– [email protected]