लडाखमधील ‘मराठी’ गुहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रजनीश राणे, [email protected]

काळाचौकीच्या नाक्यावरून लेह-लडाखला जाणे यात काहीच अप्रूप नाही. म्हणजे मनात इच्छा असेल आणि खिशात पैसे असतील तर हे सहजशक्य आहे. मात्र काळाचौकीच्या नाक्यावरून थेट लडाख गाठायचे आणि तेथे चक्क ‘मराठी’ गुहा बांधायची, यात मात्र गंमत आहे, थ्रील आहे. ‘रोव्हर्स डेन’ अर्थात ‘भटक्यांची गुहा’ बांधण्याचे हे काम केले आहे कौस्तुभ दळवी, ग्रीष्मा सोले, चिन्मय तळाशीलकर आणि ओंकार पाटील या चारचौघांतील वेगळय़ा ‘चौघांनी’!

कश्मीर हा या भूलोकीचा स्वर्ग म्हणत असाल तर लेह-लडाख ही स्वर्गाची वरची स्टेज आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लेह-लडाखमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने मुंबई वा दिल्लीहून थेट विमानाने लडाखला जाण्याचे धारिष्टय़ कुणी दाखवत नाही. त्यासाठी व्हाया श्रीनगर असा मोटार रस्ता शोधला जातो. म्हणजे श्रीनगर-कारगील-लेह असा प्रवास करताना उंचच उंच जाताना तुमच्या शरीराला ऑक्सिजन मात्रेची मात्रा लागू पडते. लडाख टूर चारचाकीने करणारे ‘फॅमिली पिकनिक’ या सदरात येतात. पण अवघड घाटवळणे पार करत मोटरसायकलने लडाख गाठणाऱयांचाही एक मोठा वर्ग आहे आणि हा वर्ग तरुणाईचा आहे. लडाखला जाऊन ‘प्रेयर फ्लॅग’ मिळवण्याचे ध्येय असते.

काळाचौकीच्या कौस्तुभ दळवी, ग्रीष्मा सोले, चिन्मय तळाशीलकर आणि ओंकार पाटील या चार मराठी तरुण-तरुणीनी असेच लडाख गाठले आणि तेथे चक्क ‘भटक्यांची गुहा’च उभारली. मुख्य बाजार आणि शांती स्तूपांच्या जवळ असणाऱया ४० वर्षे जुन्या दगडी घराचे आधुनिक आनंददायी रूप म्हणजे रोव्हर्स डेन हॉस्टेल. या गुहेत बॅगपॅकर्स आणि बायकर्स यांचे खास स्वागत आहे.

भटक्यांची गुहा बांधली दळवी आणि सोले यांनी, पण चिन्मय आणि ओंकार या दोघांनी ती लडाखी संस्कृतीने ‘रंगवली’ आहे. गुहेच्या सभागृहातील श्रीनगर-लेह-मनाली या भन्नाट मार्गाचा भव्य नकाशा, या मार्गावरील पर्यटनस्थळांची चित्रे हे येथे येणाऱया पर्यटकांचे आकर्षण आहे. रोव्हर्स डेन तुमचा लडाखमधील उत्तम गाइड आहे. म्हणजे प्रवासात लागणारे सर्व परवाने मिळवून देणे, लेहच्या पायी किंवा बाईक सफारीचा आनंद मिळवून देणे अशी सर्व मदत ही गुहा करते.

धकाधकीच्या आयुष्यापासून दूर जाऊन मोकळय़ा वातावरणात शांततेसाठी आलेली आनंदी माणसे एकमेकांशी जोडली जावी हेच उद्दिष्ट मनाशी बाळगत या ‘चारचौघां’नी ही गुहा बांधली आहे, रंगवली आहे. लेहच्या सौंदर्यासोबत लडाखी संस्कृती अनुभवायची असेल तर ‘रोव्हर्स डेन’ला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी www.roversden.com ला अवश्य भेट द्या. लडाखच्या उंचच उंच डोंगरावर वसलेली ती भटक्यांची गुहा तुम्हाला बोलावतेय… चला तर मग बॅगा भरा पटापट!