
न्हावाशेवा । राजकुमार भगत
चिरनेर-खारपाडा रस्त्यावर दिघाटी गावाजवळील घाटात एक कंटेनर ट्रेलर उलटल्यामुळे या मार्गावरील रविवार दिवसभर वाहतूक बंद करण्यात आली. रविवारी सकाळी चिरनेर बाजूने हा कंटेनर ट्रेलर साई येथिल आर्शिया कंपनीकडे निघाला होता. दिघाटी घाट उतरताना उतरणीवर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रेलर उलटला. रस्त्याच्या मधोमध हा कंटेनर ट्रेलर पडल्याने हा रस्ता संपूर्णपणे बंद झाला होता.
चिरनेर खारपाडा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा असते. अनेक धोकादायक वळणे या घाटात असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात. मुंबई, ठाण्याहून गोवा, कोकणकडे जाणाऱ्यांसाठी हा मार्ग शॉर्टकट आणि वाहतूक कोंडी नसल्यामुळे या मार्गावर नेहमी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रविवारी सकाळी ९ वाजता या अपघातामुळे रस्ता बंद झाल्यामुळे या मार्गावर जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाला होता. काही वाहनांना १० किलोमिटर वळसा घालून वशेणी-केळवणे मार्गे जावे लागले. अपघात झालेले हे ठिकाणी पनवेल पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते मात्र दिवसभर कोणीही पोलिस येथे फिरकले नाहीत. संध्याकाळ पर्यंत हा कंटेनर ट्रेलर रस्त्यावर आडवा पडलेला होता. या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र अपघातानंतर गाडीतील ऑईल आणि इंधन रस्त्यावर पडल्यामुळे अनेक दुचाकीस्वार येथे घसरून पडल्याच्या घटना घडल्या.






















































