बँक खात्यात मिनिमम बॅलेन्स नसणाऱ्यांकडून दंडापोटी ५ हजार कोटींची वसूली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

तब्बल  २१  सरकारी आणि ३ मोठय़ा खासगी बँकांनी खात्यात कमीत कमी रक्कम ठेवण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा ग्राहकांकडून बँकांनी दंडापोटी तब्बल ५ हजार कोटी रुपयांची रक्कम वसूल केली आहे. २०१७-१८ या वित्तीय वर्षात बँकांनी बँक खात्यात आवश्यक रकमेपेक्षाही कमी पैसे ठेवणाऱ्या ग्राहकांकडून हा दंड वसूल केला आहे.

हिंदुस्थानातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला यंदाच्या वर्षात तब्बल ६ हजार ५४७ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. ग्राहक आपल्या खात्यात आवश्यक रक्कम ठेवत नसल्यामुळे बँकेला हे नुकसान झाले आहे. एसबीआयनंतर एचडीएफसी बँकेने आपल्या खात्यात कमीत कमी रक्कम न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून मोठय़ा प्रमाणावर दंड वसूल केला आहे. एचडीएफसीने अशा ग्राहकांकडून ५९० कोटी रुपये दंड वसूल केला असून ही रक्कम मागीलवर्षीच्या ६१९ कोटी रकमेपेक्षा कमी आहे. एचडीएफसीपाठोपाठ ऍक्सीस बँकेने ग्राहकांकडून ५३० कोटी रुपयांचा तर आयसीआयसीआय बँकेने ३१७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.