
सामना ऑनलाईन ।मुंबई
अंधेरी गोखले उड्डाण पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे हद्दीतील ४४५ उड्डाण पूल, पादचारी पूल व पाइपलाइन पुलांची सुरक्षा तपासणी संयुक्त पथकाकडून केली जात आहे. पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ उड्डाण पूल, अंधेरी, दादर व एल्फिन्स्टन या केवळ चारच उड्डाण पुलांची संयुक्त तपासणी पूर्ण झाली आहे. तर मध्य रेल्वेच्या करी रोड, चिंचपोकळी (आर्थर पूल), टाटा पॉवर केबल पूल, एस पूल, भायखळा उड्डाणपूल, ऑलिवंट, रे रोड, चुनाभट्टी उड्डाण पूल या आठ महत्त्वाच्या पुलांची संयुक्त तपासणी पूर्ण झाली आहे.
पश्चिम रेल्वेने आपल्या इंजिनीअर्सकडून स्वतंत्ररीत्या पाहणी करीत सर्व 29 उड्डाण पुलांची सुरक्षा तपासणी पूर्ण केली आहे. मात्र पश्चिम रेल्वेच्या, पालिका व आयआयटीकडून करण्यात येणाऱ्या संयुक्त पाहणीचा वेग मात्र मंदावला आहे. उर्वरित संयुक्त तपासणीसंदर्भात आयआयटी व पालिकेडून माहिती मिळताच ती देखील प्रक्रिया सुरू करू, असे पश्चिम रेल्वेचे अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (इन्फ्रा)कन्हैया झा यांनी स्पष्ट केले. सर्व पुलांची तपासणी पूर्ण करण्यासाठी रेल्वे, पालिका व आयआयटीच्या संयुक्त पथकाला सहा महिन्यांचा कालावधी रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.




























































