
सामना प्रतिनिधी। धाराशिव
मराठा आरक्षणाची धग जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोमवारी कळंब तालुक्यातील बरमाचीवाडी येथे महादेव मनोहर बाराखोते या तरुणाने (२५) गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी महादेवने चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात आरक्षण मिळत नसल्यानेच आपण आत्महत्या करत असल्याचं त्याने म्हटलं आहे. दरम्यान, महादेवच्या आत्महत्येनंतर मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांची संख्या १९ झाली आहे.
मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी कळंब तालुक्यातील देवळाली येथील तृष्णा माने या तरुणीने विषारी औषध पिवून आत्महत्या केली होती. या घटनेपाठोपाठ सोमवार, ६ ऑगस्ट रोजी याच तालुक्यातील बरमाचीवाडी येथील महादेव या तरुणाने सकाळी दहाच्या सुमारास स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी महादेव बाराखोते या तरुणाने एक चिठ्ठी लिहीली असून त्या चिठ्ठीमध्ये ’मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे तसेच पावसाअभावी सोयाबीन वाळून दरवर्षी होणाऱ्या नुकसानीमुळे आत्महत्या करत आहे’ असे नमूद केले आहे.
महादेव बाराखोते याची १.९० हेक्टर जमीन असून त्या जमिनीवर कर्ज ही होते. महादेवच्या पश्चात आई – वडील, थोरला भाऊ, भावजय असा परिवार आहे. येरमाळा पोलिसांत याबद्दल नोंद करण्यात आली असून महादेव याच्या आत्महत्येमुळे गावावर शोककळा पसरली आहे.























































