
सामना ऑनलाईन । लखनौ
बहुजन समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी आता नवा डाव टाकला आहे. एससी/एसटी विधेयकातील सुधारणाचं स्वागत करताना त्यांनी आर्थिक निकषावर अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याच्या मागणीचं समर्थन तर केलंच. त्याचबरोबर मुसलमान्यांसाठी देखील आरक्षण मिळावं अशी मागणी देखील केली.
‘केंद्र सरकार उच्च वर्णिय जातीच्या गरीबांना संविधानात सुधारणा करून आरक्षण देण्यासाठी पाऊल उचणार असेल तर त्याचं समर्थन सर्व प्रथम बसप करेल’, असं मायावती म्हणाल्या. तसेच मुस्लीम आणि अन्य धर्मीय अल्पसंख्याक समाजात गरीबांची संख्या मोठी आहे. तेव्हा त्यांच्यासाठी देखील आरक्षणाची व्यवस्था केली गेली पाहिजे, अशी जोरदार मागणी त्यांनी वेळी केली.
लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती सुधारणा विधेयक राज्यसभेत देखील मंजूर होईल अशी आशा मायावती यांनी व्यक्त केली. मात्र हे सारं होत असताना दलितांना मोठा त्रास सहन करावा लागला. दलितांनी हिंदुस्थान बंद यशस्वी करून दाखवल्यामुळेच हे सुधारणा विधेयक आल्याचं म्हणत त्यांनी आपल्या पक्षाला याचं श्रेय दिलं.




























































